You are currently viewing !!श्री!!

!!श्री!!

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ राखी जोशी यांचं पत्र लेखन

प्रिय,
आज वयाच्या अशा आडनिड्या वळणावर मला तू पुन्हा नव्याने दिसशील आणि मी तुला पत्र नव्हे तर प्रेमपत्र लिहीन असा विचार मी स्वप्नातही केला नव्हता.
खूप दिवसांनी मनाची मरगळ घालवावी म्हणून आम्ही दोघे लांब कुठेतरी गाडीत फिरायला निघालो. माझी नजर खिडकीबाहेर , आणि,आणि रस्त्याच्या कोपऱ्यावर तू दिसलास. क्षणभर मी चमकलेच. तुझे ते रूप पाहून. खिडकीबाहेर मान काढून तुलाच पहात राहिले,अगदी लहान मुलीसारखी.
आणि मग शोधत सुटले तुलाच रस्त्याच्या दुतर्फा. सगळीकडे तू तू आणि तूच दिसलास मला. अगदी माझ्या लहानपणी दिसायचा ना तितकाच देखणा दिसत होतास अजूनही. मग इतके दिवस माझ्या लक्षात कसं आलं नाही की तू हरवला आहेस? की मीच हरवले होते? नव्या संसारात, घड्याळाच्या काट्यावर धावताना स्वतः लाच विसरले होते आणि कदाचित तुलाही.
तू मला अगदी लहानपणापासून आवडायचा अगदी तेव्हापासून जेव्हा प्रेम म्हणजे काय हे सुध्धा कळत नव्हतं मला आणि मी आई ला सांगितलं होतं की तू माझं पाहिलं प्रेम आहेस. तेव्हा पोट धरून हसलेली आई मला अजून आठवते. आमच्या टुमदार घराच्या कमानी जवळ तुझा कायमचा मुक्काम. माझ्या खोलीतल्या खिडकीतून तासनतास तुला पाहणं हा माझा खास छंद. तुझं रूप, तुझा बहर, तुझे रंग कुणीही प्रेमात पडावं असेच. तुझ्याकडे पहातच तर गट्टी जमली ना कवितेशी. कधी कधी तर मी एकटीच तुझ्याशी बडबड करत बसायचे. मी खिडकीत , तू कमानिशी पण थेट संवाद व्हायचा आपला. मग भेटू लागलास तू शाळेत जायच्या रस्त्यावरही. चीत्रकारालही हेवा वाटेल असे तुझे रंग पाहून मी भान हरपून बघत राहायचे नुसती. तूच माझा सखा, दोस्त,यार झाला होतास. छोट्या,मोठ्या कोणत्याही रुपात तू सुंदरच दिसतोस. इतर सगळ्यांपेक्षा वेगळा. म्हणून तर मला तू खूप आवडायचा ना. पणआयुष्याच्या, संसाराच्या स्पर्धेत भाग घेतला अन् मग काय धावतच सुटले वेड्यासारखी. दुर्लक्ष झालं तुझ्याकडे. पण तू तेव्हाही होतास आत्ताही आहेस अगदी तसाच. आत्ता लक्ष गेलं तेव्हा जाणवलं ना मला. तुझं सौंदर्य कणभरही कमी झालेलं नाही. भरभरून देतो आहेस फक्त .
उगवतीचे रंग घेवून येणारा, धरणीवर सोनरश्मी किरणांची उधळण करणारा दिनकर आणि क्षितिजावर हळदीकुंकवाचां सडा टाकणारा रवी त्याची ती सोनसळी किरणे जेव्हा तुझ्या हिरव्याकंच पानापानातून आणि डवरलेल्या फुलातून जमिनीवर येतात ना तो तर जणू अवर्णनीय सोहळाच भासतो मला
आता तुला खरं खरं सांगू मला तू का आवडतो? का इतकं प्रेम करते मी तुझ्यावर? वेड्यासारखी…….
कारण तू देतोस जगाला जगण्याचा मंत्र. भर उन्हाळ्यात जेव्हा रवी आग ओकत असतो आणि जाळत असतो धरणीला. माणसं ही अंगाची लाही लाही होते म्हणून तक्रार करत असतात. इतर अनेक वृक्ष जेव्हा पाण्यासाठी आसुसातात…. किंवा अगदी मान टाकतात तेव्हा तू शिकवतो की विपरीत परिस्थितीतही फुलून येणं म्हणजे काय असतं. बहरून येतो पनोपान अन् दाखवून देतो निसर्गाला की आव्हानाला उत्तर देणं म्हणजे काय असतं? कसं असतं हसतमुखाने जगणं आणि वेगळेपण सिध्द करणं कशाला म्हणतात? या तुझ्या एका गुणावर मी आयुष्य ओवाळून टाकलंय रे……..
कारण तू मला माझ्या अनेक अनेक निराशेच्या काळोखातून, अपयशाच्या दरीतून, नको नकोशा प्रसंगातून बाहेर पडायला शिकवलंस . फक्त तुझ्या बहरलेल्या रुपाकडे डोळे भरून पाहिलं की किती आणि कशी ऊर्जा येते मला हे मी नाही सांगू शकत तुला. आणि हो आज पुन्हा नव्या दृष्टीने तुझ्याकडे पाहिलं आणि मनाची मरगळ अगदी क्षणात पळून गेली. मी पुन्हा नवचैतन्य ल्यायले. पुन्हा नव्याने मला माझ्यातली मी, माझी कविता सगळ्यांचाच साक्षात्कार झाला. म्हणून पुन्हा एकदा कबूल करते की हो तूच आहेस माझं पाहिलं प्रेम.
गाडी आमच्या फार्महाऊसवर जाऊन थांबली आणि अहो म्हणाले “अग इथे कमानी जवळ आपण एक गुलमोहर लावुया का? तुझ्या हाताने.? तुला आवडतो ना खूप?”. मी नि:शब्द.

*नको नकोशा संकटांचे*
*आभाळ जेव्हा फाटते*
*ठरवून माझ्या मनाला*
*गुलमोहर व्हावे वाटते*

तुझी आणि तुझीच

वेडी प्रेयसी

राखी जोशी
नाशिक
८३९००८८००१

प्रतिक्रिया व्यक्त करा