मुंबई : प्रतिनिधी
बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनमध्ये आता मोठी नावे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (२५ सप्टेंबर) अभिनेत्री रकुल प्रीत सिंहसह दीपिका ची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांना एनसीबीने चौकशीकरिता पाचारण केले होते. या चौकशी दरम्यान दोघींकडूनही अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे. ड्रग्ज देवाण-घेवाणीसाठी बनवलेल्या व्हाट्सअॅप ग्रुपची ‘अॅडमिन’ दीपिका स्वतः असल्याचे, करिश्माने एनसीबीला सांगितले. यामुळे आता दीपिकाच्या अडचणींत वाढ झाली आहे.
काही कालावधीनंतर ड्रग्जच्या देवाण-घेवाणीसाठी या ग्रुपचा वापर सुरू झाला
क्वान टॅलेंट कंपनी आणि दीपिका यांच्यात कामाविषयीच्या अपडेट देण्यासाठी हा ग्रुप तयार करण्यात आला होता. परंतु काही कालावधीनंतर ड्रग्जच्या देवाण-घेवाणीसाठी या ग्रुपचा वापर सुरू झाला. या ग्रुपमध्ये दीपिका पदुकोण, जया साहा आणि करिश्मा प्रकाश यांचा समावेश होता. दीपिका पदुकोण स्वतः या ग्रुपची ”अॅडमिन’ होती. या ग्रुपवर ती ड्रग्जची चौकशी आणि मागणी करायची, असे करिश्माने एनसीबी चौकशीत सांगितले आहे.
२६ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे कळवले
जया साहाने चौकशीदरम्यान करिश्माचे नाव घेतले होते. एनसीबीने आधी जया साहाची चौकशी केली होती. या चौकशी दरम्यान तिने अनेक बड्या मंडळींची नावे घेतली असून, या सगळ्यांना सीबीआयने समन्स बजावले आहेत. एनसीबीचे समन्स मिळाल्यानंतर सिनेमाच्या शूटिंगसाठी गोव्याला गेलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण काल रात्री मुंबईत दाखल झाली आहे. तिने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला आपण 26 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे कळवले आहे.
करिश्मा म्हणते की, ‘हॅश नाही गांजा आहे.’
दीपिका आणि श्रद्धा कपूरचे नाव सुशांत सिंहची टॅलेंट मॅनेजर जया साहाच्या चौकशीत समोर आले आहे. तर, मॅनेजर करिश्मा प्रकाश सोबतचे व्हॉट्सअॅप चॅटही NCBच्या हाती लागले आहेत. त्या कथित चॅटमध्ये दीपिका करिश्माला विचारते, ‘तुझ्याकडे माल आहे का’? करिश्मा यावर रिप्लाय देते की, ‘हो. पण घरी आहे. मी आता वांद्र्याला आहे. जर म्हणशील तर अमितला विचारते.’ परत दीपिका मेसेज करते. ‘हो प्लीज’. काही वेळानं करिश्मा उत्तर देते, ‘अमित घेऊन येत आहे.’ यावर दीपिका विचारते, ‘हॅश आहे का?’ त्यावर करिश्मा म्हणते की, ‘हॅश नाही गांजा आहे.’