कुडाळ
कुडाळ नगरपंचायत क्षेत्रात सध्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर आरोग्य सर्वे सुरू असून या सर्वेसाठी नगरपंचायत कर्मचारी व आशा स्वयंसेविकांची नियुक्ती केली आहे मात्र त्यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा प्रशासनाने दिल्या नाहीत त्यांचेही कुटुंब आहे त्यांनाही कुटुंबाची जबाबदारी आहे. प्रशासनाने या कर्मचा-यांची जबाबदारी घ्यावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी दिला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासनाने माझे कुटूंब माझी जबाबदारी ही मोहिम सुरू केलेली असून कुडाळ नगरपंचायत हद्दीमध्ये कुडाळ नगरपंचायतीच्या कर्मचारी वर्गाला या मोहिमे अंतर्गत अतिरिक्त काम दिलेले आहे. कोवीड-१९ या कालावधीमधील कुडाळ नगरपंचायत हद्दीमध्ये करण्यात येणारा हा तब्बल पाचवा सर्वे आहे. तसेच सदर कर्मचारी वर्गाला नगरपंचायतीचे काम सांभाळून हे काम करावे लागत आहे. परिणामी याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे.
सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून कुडाळ शहरामध्ये याची मोठ्या प्रमाणात लागण झालेली आहे. कुडाळ नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने १५ कर्मचारी व ५ आशा सेविका यांची नियुक्ती केलेली आहे. परंतू सदर कर्मचा-यांना शासनाने कोणतेही विमा संरक्षण दिलेले नाही. सदर कर्मचा-यांच्या घरी वयोवृद्ध आई-वडील, काका-काकी तसेच लहान-लहान मुलेही आहेत. सर्व कर्मचारी हे घरो-घरी नेहमी फिरत असल्याने त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे कर्मचारी सर्वेसाठी प्रत्येक घरोघरी फिरत असल्याने काही घरात त्यांना काहीही माहिती न देता माघारी पाठविले जाते. पाच वेळा सर्वे करून प्रशासनाने काय साध्य केले? विनाकारण जिल्हा प्रशासन नगरपंचायत कर्मचारी व आशा सेविकांना वेठीस धरत आहेत. माझे कुटूंब माझी जबाबदारी मग नगरपंचायत कर्मचारी व आशा सेविका तुमची जबाबदारी नाही का? सदर माहिती आपण व्हाटस् एप द्वारे ही मिळवू शकता, प्रशासनाने एखादा नंबर जाहिर करून व्हाटस् एप द्वारे सदर माहिती नागरिकांना या नंबरवर पाठविण्यास सांगितल्यास प्रशासनाचे सर्वेक्षण पूर्ण होऊ शकतो.
नगरपंचायत कर्मचारी वर्गाला अथवा आशा सेविकांना कोरोनाची लागण होवून बळी गेल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार जिल्हा प्रशासन राहील, जो पर्यंत यांची संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासन घेत नाही तो पर्यंत हा सर्वे थांबवावा अन्यथा नाईलाजाने आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी दिला आहे.