फोंडाघाट
आज तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन होत आहे. गुटखा, तंबाखू्, धुम्रपान, दारू या व्यसनांच्या आहारी जात असून त्यामुळे शारीरिक, मानसिक, आर्थिक तसेच सामाजिक दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. हे रोखण्यासाठी कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटच्या राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी.), तसेच एन.एस.एस. व आजीवन अध्ययन विस्तार विभागांच्यावतीने ३१ डिसेंबर रोजी “व्यसनमुक्ती जनजागृती रॅली”चे आयोजन करण्यात आले हाेते.
विद्यार्थ्यांनी तयार केलेले व्यसन विरोधी जनजागृतीचे फलक लक्षवेधी ठरले. विद्यार्थ्यांनी “31 डिसेंबर – नाे बीअर, नाे चिअर”, “दारूने झिंगला – संसार भंगला” नशे की आदत देगी, बिमारी को दावत । अशा अनेक व्यसन विरोधी घोषणा देऊन फोंडाघाट परिसर दणाणून टाकला.
फोंडाघाट महाविद्यालयातून निघालेली व्यसन विरोधी जनजागृती रॅली फोंडाघाट बाजारपेठेतून नेऊन तिची फोंडाघाट एसटी स्टॅण्ड येथे सांगता झाली.
एन.सी.सी. विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉ. राज ताडेराव, एन.एस.एस. विभाग प्रमुख प्रा. डॉ. बालाजी सुरवसे, आजीवन अध्ययन विस्तार विभाग प्रमुख प्रा. संतोष रायबोले जिमखाना विभागप्रमुख प्रा. जगदीश राणे यांनी या व्यसन विरोधी जनजागृती रॅलीचे यशस्वीरीत्या आयोजन केले. यावेळी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.