You are currently viewing आमदार रविंद्र चव्हाण किंगमेकर

आमदार रविंद्र चव्हाण किंगमेकर

जिल्ह्यातील शिवसेनेचे किंगमेकर केसरकर स्वपक्षांकडून दुर्लक्षित

शिवसेनेचा जिल्ह्यातील प्रवास अगदी लहान मुलांना देखील तोंडपाठ झाला आहे. नारायण राणेंचा शिवसेनेला रामराम आणि सेनेची जिल्ह्यात झालेली वाताहात खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना देखील रोखता आली नव्हती हे सत्य आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरेंनी त्यावेळी सभेला गर्दी खेचली होती परंतु गर्दीचे रूपांतर मतांमध्ये झाले नव्हते, त्यामुळेच शिवसेनेचे त्यावेळचे पोटनिवडणुकीतील उमेदवार परशुराम उपरकर यांना डिपॉझिट देखील वाचवता आले नव्हते. जॉईंट किलर वैभव नाईक शिवसेनेत डेरेदाखल झाले आणि सेनेचे रोप मुळं धरू लागलं होतं, परंतु नारायण राणेंना हरवणे त्यांना शक्य नव्हतं, तेवढी ताकद शिवसेनेत नव्हती. दीपक केसरकर यांनी नारायण राणेंच्या दहशतवादाचा मुद्दा उचलून धरत राष्ट्रवादीतून सेनेत दाखल झाले आणि हळूहळू जिल्ह्यातील लोकांचा पाठिंबा मिळत गेला, तशी शिवसेनेची ताकद वाढली आणि पुढील रामायण घडले.
नारायण राणे पराभूत झाले, वैभव नाईक जॉईंट किलर बनले…खासदार विनायक राऊत प्रचंड मताधिक्क्यानी विजयी झाले….परंतु या विजयामध्ये दीपक केसरकर यांनी नारायण राणेंच्या विरोधात उभारलेला एल्गार हा महत्वाचा मुद्दा होता. केसरकरांनी जिल्हावासीयांच्या मानसिकतेत बदल घडवून शिवसेनेला गेलेले सोनेरी दिवस परत आणून दिले. शिवसेनेने देखील केसरकरांना मंत्रिपद देत परतफेड केली. परंतु पुढच्याच निवडणुकीत शिवसेनेच्या आमदार खासदारांना मिळालेल्या विजयाच्या वलयामुळे दीपक केसरकर नकोसे झाले….आपल्या जिल्ह्यात पालकमंत्री पद नसलं तरी चालेल परंतु केसरकारांना बाजूला केलं पाहिजे म्हणून सेना नेतृत्वाची दिशाभूल करून जिल्ह्याच्या राजकारणातून केसरकरांना दुर्लक्षित केलं गेलं. उदय सामंत यांना मंत्रिपद देत जिल्ह्याचे पालकमंत्री पद रत्नागिरीला पाठवलं गेलं. तिथेच सेना नेतृत्व चुकलं आणि शिवसेनेला जिल्ह्यात उत्तरती कळा लागली.
भाजपाने डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी देत जिल्ह्यात पाठवले. रवींद्र चव्हाण यांनी आपल्या कल्पक नेतृत्वाने समोर नारायण राणेंना मात देणारे दीपक केसरकर असताना देखील युक्ती, शक्ती आणि सक्तीच्या मार्गाने अनेक विजय खेचून आणले. केसरकरांना खड्यासारखे बाजूला केल्याने नाराज सावंतवाडीकरांनी देखील सेनेला सोडचिठ्ठी देत भाजपाला जवळ केलं. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसारखी जिल्ह्याची आर्थिक नाडी देखील रवींद्र चव्हाण यांनी आपल्या अक्कल हुशारीने भाजपाकडे खेचून घेतली. त्याचा प्रत्यय आला तो दोडामार्ग मध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी “रवींद्र चव्हाण आगे बढो… हम तुम्हारे साथ हैं” अशा केलेल्या घोषणांमधूनच. नारायण राणेंसारखे केंद्रीय नेतृत्व सोबत असताना देखील रवींद्र चव्हाण यांनी आपले वेगळेपण जपत निवडणुका कशा जिंकायच्या असतात हेच दाखवून दिले.
शिवसेना नेतृत्वाने बाजूला केलेले दीपक केसरकर यांनी मात्र आपले काम चोख बजावले. दोडामार्ग मध्ये ऐन निवडणुकीच्या दरम्यान शिवसेनेला ठेंगा दाखवत भाजपच्या गोटात गेलेले प्रकाश गवस यांच्या विरोधात दीपक केसरकर यांनी जानकी कॅश्यूचे गणपत देसाई यांना उभे करत नवी चाल खेळली आणि निवडूनही आणले. तळवडे येथील राणे समर्थक माजी जि. प. सदस्या सौ.आनंदीताई परब यांचे चिरंजीव विद्याधर परब यांना शिवसेनेचे शिवबंधन बांधत उमेदवारी दिली आणि ती सीट देखील शिवसेनेच्या ताब्यात घेतली. त्यामुळे दीपक केसरकर सहकारात देखील आजही लोकांच्या हृदयात स्थान टिकवून असल्याचा प्रत्यय आला. खासदार विनायक राऊत हे शिवसेनेचे सचिव आणि जुने शिवसैनिक असले तरी ते जिल्ह्यातील शिवसेनेचा चेहरा नाहीत, तर नारायण राणे यांना प्रत्येकवेळी नडलेले, राणेंच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना दोन वेळा पराभव चाखायला लावणारे माजी पालकमंत्री हा जिल्ह्यातील शिवसेनेचा चेहरा आहे. केसरकर रस्त्यावर उतरून आक्रमकता दाखवत नसतील परंतु त्यांची कृती आक्रमक असते हेच त्यांनी नारायण राणेंच्या विरोधात उभे ठाकल्यावर प्रत्येक निवडणुकीत दाखवून दिले. दीपक केसरकर यांची आक्रमकता होती म्हणूनच वैभव नाईक इतिहास घडवू शकले आणि विनायक राऊत दोनवेळा खासदारकीची निवडणूक मोठ्या फरकाने जिंकले.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत, सत्ता शिवसेनेची आहे, राष्ट्रवादी सोबत आहे, पालकमंत्री उदय सामंत हे मुरब्बी राजकारणी आहेत, जॉईंट किलर वैभव नाईक, विनायक राऊत सर्व एकापेक्षा एक मातब्बर नेते आहेत, परंतु सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत यापैकी कोणाचे नेतृत्व दिसून आले का? हाच प्रश्न आज जिल्हावासीयांना पडला आहे. राजकारणात माणसांपेक्षा लोकांना पैसा मोठा वाटायला लागला आहे हे सत्य असलं तरी ज्यांच्याकडे राज्याची सत्ता आहे, जिल्ह्यात खासदार, दोन आमदार आहेत, पालकमंत्री आहेत त्यांना जिल्ह्यातील एकाही निवडणुकीत बाजी मारता येत नाही म्हणजे सर्वकाही आलबेल नसल्याचेच दिसून येत आहे. भविष्यात असंही होऊ नये की दीपक केसरकरांना राजकारणातून दुर्लक्षित करता करता लोकांनी शिवसेनेला आपल्या मनातून दुर्लक्षित करू नये….अन्यथा पुन्हा जिल्हावासीयांच्या मनात स्थान निर्माण करणे म्हणजे शिवसेनेला न पेलणारे इंद्रधनुष्य असेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा