You are currently viewing काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट सावंतवाडीचे खजिनदार गुरुनाथ नार्वेकर यांचे निधन

काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट सावंतवाडीचे खजिनदार गुरुनाथ नार्वेकर यांचे निधन

“नार्वेकर मसाला” म्हणून प्रसिद्ध फर्म

श्री.काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट, अध्यात्म केंद्र, सावंतवाडीचे खजिनदार व “नार्वेकर मसाला” या सावंतवाडीत प्रसिद्ध असलेल्या दुकानाचे मालक गुरुनाथ नार्वेकर यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. मागच्याच महिन्यात त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता. गेले काही दिवस प्रकृती खालावल्याने त्यांना अधिक उपचारार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. नार्वेकर यांच्या प्रकृती अस्वास्थ्याची खबर कणेरी मठाचे मठाधिपती श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींना लागताच अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींनी सावंतवाडीत येत श्री नार्वेकर यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली होती. श्री.अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणजेच आपल्या गुरूच्या भेटीनंतर नार्वेकर यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
“नार्वेकर मसाला” या नावाने सुरू केलेला सर्व प्रकारच्या मालवणी मसाल्याचा व्यवसाय गेली अनेक वर्षे आपले नाव राखून आहे. कोकण सह मुंबई, पुणे आदी ठिकाणीही नार्वेकर मसाला फेमस आहे. श्री.काडसिद्धेश्वर मठ कोल्हापूरचे सावंतवाडी येथील श्री.काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्टचे अध्यात्म केंद्र,माठेवाडा याचे ते खजिनदार होते. नार्वेकरांचा मठ अशीच मठाची ओळख सर्वत्र आहे. आध्यात्मिक विचारांचा पगडा असलेले श्री.नार्वेकर यांनी नव्या पिढीने अध्यात्माकडे वळावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. सावंतवाडी काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्टच्या उन्नतीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या निधनाने सावंतवाडी काडसिद्धेश्वर मठाची न भरून येणारी हानी झाली आहे.
सावंतवाडी मठाचे अध्यक्ष परशुराम पटेकर, सचिव भगवान राऊळ, मंगेश राऊळ, सुमती कासकर आदींनी तसेच कणेरी मठावरील श्री.शंकरानंद स्वामी, शहरातील अनेक जणांनी श्री.नार्वेकर यांचे अंतिम दर्शन घेतले. सावंतवाडी येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन लग्न झालेल्या मुली आहेत. नार्वेकर मसालाचे श्री.भरत नार्वेकर व ठेकेदार श्री.अवधूत नार्वेकर यांचे ते वडील होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा