मालवण :
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मालवण येथील तहसील कार्यालयातील मतदान केंद्रात खेळीमेळीच्या वातावरणात १०० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणूकीसाठी ११० मतदारांनी मतदान केले. मतदानावेळी महाविकास आघाडी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या बुथवर गर्दी केली होती. सिंधुदुर्ग जिल्हा बँके ताब्यात घेण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार फिल्डिंग लावल्याचे चित्र यावेळी दिसून आले. तर महाविकास आघाडीनेही बँकेत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. मागील १९ वर्ष बँकेचे संचालक असलेल्या विकास संस्था मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार व्हिक्टर डॉन्टस विरुद्ध भाजपा उमेदवार बाळू कुबल यांच्यातील हायव्होल्टेज लढतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. येथे दोन्ही बाजुंकडून विजयाचे दावे- प्रतिदावे केले जात आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची यंदाची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि राज्याचे लक्ष वेधून घेणारी ठरली. या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख सतीश सावंत यांचे समर्थक असलेल्या संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर या प्रकरणात पोलिसांकडून आमदार नितेश राणे यांचे नाव जोडले गेल्याने ही निवडणूक राज्यात प्रतिष्ठेची ठरली आहे. मालवण येथील तहसील कार्यालयात या निवडणुकीसाठी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया ठेवण्यात आली होती. मात्र दुपारी ३ वाजताच येथील सर्वच्या सर्व ११० मतदारांनी मतदानाचा हक्क बचावल्याने १०० % मतदान झाले. कणकवली मध्ये जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत आणि शिवसेना नेते सतीश सावंत यांच्यात वादावादी निर्माण झाल्याने तेथे थोड्याफार प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी मालवणात दोन्ही बाजूंकडील नेत्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांशी संवाद साधत मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यास प्रशासनाला सहकार्य केले. निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपाच्या वतीने बूथ मांडण्यात आले होते.
भाजपाकडून माजी राज्यमंत्री आ. रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित राहून मतदानाचा आढावा घेतला. यावेळी प्रदेश सदस्य दत्ता सामंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, अशोक सावंत, दिपक परब, सुदेश आचरेकर, दिपक पाटकर, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परूळेकर, गटनेते सुनील घाडीगांवकर, वित्त आणि बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, विजय केनवडेकर, मोहन वराडकर, जगदीश गावकर, संतोष कोदे, संतोष साटविलकर, संतोष गावकर, संतोष लुडबे, मंदार लुडबे, आशिष हडकर, अविनाश राऊत, सुधीर साळसकर, कृष्णा साळसकर, महेश बागवे, जेरॉन फर्नांडिस, महेश सारंग, आप्पा लुडबे, दादा नाईक, आबा हडकर, ललित चव्हाण तसेच अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तर महाविकास आघाडी कडून शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, गणेश कुडाळकर, महेश कांदळगावकर, बाबी जोगी, साईनाथ चव्हाण, अरविंद मोंडकर, आगोस्तीन डिसोजा, डॉ. विश्वास साठे, दिपा शिंदे, मंदार केणी, मंदार ओरसकर, समीर लब्दे, समीर हडकर तसेच अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
१२ जागा… २४ उमेदवार.. आणि ११० मतदार
या निवडणूकीसाठी मालवण तालुक्यातून विकास संस्था ३, पतसंस्था १६, पणन संस्था ७, मजूर संस्था २०, दुग्ध संस्था १६, गृहसंस्था १३ आणि इतर संस्था ८ असे ११० मतदार निश्चित करण्यात आले होते. या ११० मतदारांनी १२ जागांसाठी निवडणूक रिंगणात असलेल्या २४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद केले आहे. यामध्ये कमलाकांत उर्फ बाळू कुबल (भाजपा) विरुद्ध व्हिक्टर डॉन्टस (आघाडी), प्रज्ञा ढवण, अस्मिता बांदेकर (भाजपा) विरुद्ध नीता राणे, अनारोजीन लोबो (आघाडी), रविंद्र मडगावकर (भाजपा) विरुद्ध मनीष पारकर (आघाडी), सुरेश चौकेकर (भाजपा) विरुद्ध आत्माराम ओटवणेकर (आघाडी), गुलाबराव चव्हाण (भाजप) विरुद्ध मेघनाद धुरी (आघाडी), राजन तेली (भाजपा) विरुद्ध सुशांत नाईक (आघाडी), अतुल काळसेकर (भाजपा) विरुद्ध सुशांत नाईक (आघाडी), गजानन गावडे (भाजप) विरुद्ध लक्ष्मण उर्फ बाबा आंगणे (आघाडी), महेश सारंग (भाजपा) विरुद्ध एम. के. गावडे (आघाडी), संदीप उर्फ बाबा परब (भाजपा) विरुद्ध विनोद मर्गज (आघाडी) आणि समीर सावंत (भाजपा) विरुद्ध विकास सावंत यांच्यात निवडणूक होत आहे.