जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी दखल घेणे आवश्यक
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोशल क्लब च्या नावावर पत्ते, कॅरम असे खेळ दाखवून अनेक ठिकाणी सोशल क्लब म्हणजे जुगाराचे अड्डे झाले आहेत. या सोशल क्लब मध्ये खरोखरच पत्ते, कॅरम यासारखे खेळ खेळले जातात की सोशल क्लब च्या नावावर हे सोशल क्लब अवैध धंद्यांचे कुरण बनत चालले आहेत यावर मात्र कोणत्याही सरकारी खात्याची नजर नाही. याच सोशल क्लब मध्ये जेव्हा अवैद्य धंदे सुरू होतात तेव्हा खाकीची नजर पडतेच परंतु ती केवळ आपला स्वार्थ साधण्यासाठीच.
साई सोशल क्लब, वागदे, कणकवली हा धर्मादाय आयुक्त कोकण विभागाच्या परवाना घेऊन चालविणारा सोशल क्लब च्या नावावर चालणारा जुगाराचा अड्डा आहे. कणकवलीत सुरू असलेल्या या सोशल क्लब च्या विरोधात अनेक तक्रारी झाल्या, परंतु वरपासून खालपर्यंत सर्वांनाच पैशांच्या बंधाने बांधून ठेवल्याने त्यावर कारवाई होत नाही किंवा झाली तरी कारवाई करण्यापूर्वीच त्यांना झारीतील शुक्राचार्याकडून टीप दिली जाते, त्यामुळे सर्व काही सुरळीत करून सोशल क्लब वाले नामानिराळे होतात. आता तर साई स्पोर्ट्स क्लबच्या जिल्ह्यात विविध ठिकाणी शाखा सुरू झाल्या आहेत. यात क्लब नंबर १ साईबाबा स्पोर्ट्स क्लब वागदे, कणकवली, क्लब २ मधडे मालवण (पेट्रोल पंप जवळ), क्लब ३ देवगड, वाडा यांचा समावेश आहे. धर्मादाय आयुक्तांच्या सोशल क्लबच्या एका परवान्यावर अनेक ठिकाणी शाखा सुरू करता येतात का? असा प्रश्न उभा राहत आहे.
सोशल क्लब च्या नावावर सुरू असणाऱ्या या क्लब मध्ये नक्की काय चालतं? हा एक संशोधनाचाच विषय आहे. जिल्ह्यातील तरुण पिढी स्पोर्ट्स क्लब या नावाखाली अशा क्लब मध्ये जातात आणि पैसे लावून क्लब मध्ये सुरू असलेले जुगाराचे खेळ खेळतात, त्यामुळे तरुण पिढीचे भवितव्य अंधारात असल्याचेच दिसून येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या या सोशल क्लब वर कोणाचाच वचक राहिलेला नसून राजरोसपणे येथे जुगार सुरू असतात, जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.