कष्टकऱ्यांची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वस्त्रनगरीत अनेक जण विविध माध्यमातून आपल्या परिने समाज विकासात योगदान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. यापैकीच एक म्हणजे व्यंकटराव हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते गजानन महाजन गुरुजी यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यांनी अत्यंत निरपेक्ष आणि अविचल निष्ठेच्या भावनेने आपले शहरातील विविध ठिकाणचा कचरा गोळा करुन स्वच्छता करण्याबरोबरच त्यापासून खत बनवणे आणि झाडांचे रोपन करुन ते वाढवणे ,असे सामाजिक कार्य सुरुच ठेवले आहे. एकला चलो रे याच भूमिकेतून ऊन,वारा आणि पाऊस याची तमा न बाळगता ते एखाद्या व्रतस्थाप्रमाणे आपले सामाजिक कार्य करत सामाजिक बांधिलकीचे दर्शनही घडवित आहेत.
गजानन महाजन गुरुजी म्हणजे अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेले सुसंस्कृत व्यक्तीमत्व. भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी आणि आता देशाच्या विकासासाठी ज्यांनी मोठे योगदान दिले , अशा अनेक थोरामोठ्यांच्या कार्याचा आदर्श घेवून ते आजही जीवनाच्या उतारवयात अवघ्या तरुणाईला देखील लाजवेल , अशा नव्या दमानं आणि उत्साहानं अत्यंत निरपेक्ष भावनेने समाजसेवेचे स्विकारलेले व्रत जोपासत आहेत. शहरातील कोणत्याही भागात कचरा दिसला की तो स्वतः गोळा करत स्वच्छता करायची आणि त्यातील काचेच्या फुटलेल्या बाटल्या व प्लास्टिक वेगळे करुन त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो.याशिवाय गोळा केलेल्या कच-यापासून खत बनवून ते झाडांचे रोपन करुन त्याठिकाणी त्याचा योग्य वापर करतात.त्यामुळे त्यांनी तांबे माळ ,षटकोन चौक व अन्य ठिकाणी लावलेली अनेक उपयुक्त झाडे आज योग्य देखभालीमुळे चांगल्या पध्दतीने बहरली आहेत. वरकरणी साधे आणि सोपे वाटणारे हे काम कोणत्याही यंत्रणेशिवाय किंवा मनुष्यबळाशिवाय शक्य नसले तरी इच्छा तिथे मार्ग या तत्वानुसार महाजन गुरुजींनी ते प्रत्यक्षात साकारुन सर्वांसमोर सामाजिक कार्याचा आदर्श ठेवला आहे.
त्यांच्या या व्रतस्थ सामाजिक कार्याची दखल घेवून इचलकरंजी नगरपालिकेने त्यांना स्वच्छतादूत पदवी देवून त्यांच्या कार्याचा उचित गौरव केला आहे. देशाची भावी पिढी ही देव ,देश आणि धर्मासाठी झटणारी घडावी ,यासाठी गुरुजींची संस्कार वर्ग आणि विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रामाणिक धडपड सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज ,शिवशंभू संभाजी महाराज यांच्यासह महापुरुषांच्या कार्याचा जागर समाजमनात करतानाच निकोप समाजनिर्मितीसाठी झटणारा हा चालता बोलता देवमाणूस समाजकार्यात झोकून देवून काम करताना पाहिले की ,आपोआपच त्यांच्या कार्याला सलाम ठोकण्यासाठी आपले हात उंचावत राहतात.
स्वतःच्या घराची व परिसराची स्वच्छता राखणे ,ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. पण ,आपण केवळ शासनाकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकतो .याचाच परिणाम कचरा इतरत्र साचून त्याची दुर्गंधी सुटल्याने साथीचे आजार फैलावण्याचा मोठा धोका वाढतो.त्यातच आता कोरोना आजाराचा फैलाव होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अशी परिस्थिती भविष्यात उदभवू नये व आरोग्य सुरक्षित रहावे ,यासाठी प्रत्येकाने आपल्या घराची ,परिसराची स्वच्छता राखण्याबरोबरच चांगला आहार घ्यावा आणि धुम्रपान, मद्यपान टाळावे आणि सुरक्षितता पाळून आपले आरोग्य सांभाळावे ,असे आवाहन व्रतस्थ समाज सेवाधर्माचे उपासक आदरणीय गजानन महाजन गुरुजींनी माझ्याशी संवाद साधताना केले.
@- सागर बाणदार
मो. ८८५५९१५४४०