दोन दिवसांपूर्वी सर्जेकोट कवडा रॉकसमोरील समुद्रात ट्रॉलर वरून पडून बेपत्ता झालेला खलाशी महेंद्र दामोदर पालेकर (वय ३१, रा. विरार, मुंबई) याचा मृतदेह आज देवबाग जुवा येथील समुद्रात मच्छीमारांना आढळून आला. हा मृतदेह महेंद्र पालेकर याचाच असल्याची स्पष्टोक्ती सहकारी खलाशी रामू रामप्रसाद प्रजापती (रा. उत्तरप्रदेश) याने देत याबाबत मालवण पोलीस स्थानकात खबर दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार दि. २६ डिसेंबर रोजी सर्जेकोट येथील समुद्रात श्री देवी केळबाई ट्रॉलरवरील खलाशी महेंद्र दामोदर पालेकर हा ट्रॉलरवर चढून लघुशंका करत असताना त्याचा तोल जाऊन तो समुद्रात पडून बेपत्ता झाला होता. याबाबतची खबर ट्रॉलर मालक चिराग मयेकर यांनी मालवण पोलीस स्थानकात दिली होती. या ट्रॉलरवर असणाऱ्या खलाशी रामू रामप्रसाद प्रजापती याच्यासह अन्य सहकारी खलाशांकडून गेले दोन दिवस महेंद्र याचा समुद्रात शोध घेण्यात येत होता. आज देवबागच्या समुद्रात शोध कार्य करताना देवबाग जुवा येथील १७ वाव समुद्रात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती तेथे मासेमारी करणाऱ्या बोटींवरील मच्छीमारांनी दिली. त्यानंतर त्याठिकाणी जाऊन मृतदेहाची शहानिशा केली असता तो मृतदेह बेपत्ता महेंद्र पालेकर याचाच असल्याची खात्री रामू प्रजापती व सहकाऱ्यांना पटली. हा मृतदेह किनारी आणल्यावर मालवण पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली. मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून सायंकाळी उशिरा तो शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता.