सावंतवाडी
कीटकनाशक प्राशन करून गळफास लावून घेत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मळेवाड-कोंडुरे येथील अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. मानसी प्रमोद मुळीक (१७) असे तिचे नाव आहे. दरम्यान हा प्रकार तिच्या नातेवाईकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तिला तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असतानाच तिचे निधन झाले. याबाबतची खबर तिचा चुलत भाऊ प्रितेश प्रवीण मुळीक याने सावंतवाडी पोलिसात दिली. त्यानुसार पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर नैराश्येतून तिने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मानसी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घरा नजीक असलेल्या आंब्याच्या झाडावर गळफास लावलेल्या स्थितीत तिच्या भावाच्या निदर्शनास पडली. यावेळी त्याने तिला दोरी सोडून तात्काळ खाली उतरवले. यावेळी ती अत्यवस्थ बनली होती. दरम्यान नातेवाईकांनी तिला अधिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी तिने कीटकनाशकही प्राशन केल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान तिला वाचविण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपले शर्तीचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र तिचे निधन झाल्यामुळे ते प्रयत्न असफल ठरले.