भाजपची नेतेमंडळी राणेंच्या बंगल्यावर; कार्यकारीणी बैठकीकडे लक्ष…
कणकवली
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नीतेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीयमंत्री नारायण राणे अचानक कणकवलीत दाखल झाले आहेत. तर भाजपची अनेक नेतेमंडळीही राणेंच्या ओम गणेश निवासस्थानी उपस्थित आहेत. दरम्यान शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात सर्वच नाका, चौकात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान आज भाजप जिल्हा कार्यकारणीची प्रहार भवन येथे बैठक होत आहे. या बैठकीत काय निर्णय घेतला जातो याकडे भाजप कार्यकर्त्यांसह जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
संतोष परब यांच्यावरील हल्ल्यानंतर भाजप आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप – प्रत्यारोपांचा सामना रंगला होता. यानंतर आमदार नीतेश राणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांची पोलिसांनी चौकशी केली होती. त्यानंतर काल (ता.२७) आमदार नीतेश राणे यांनी ओरोस येथील जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. यानंतर जिल्ह्यातील राजकीय तणाव वाढला आहे. याखेरीज राणेंना अटक झाल्यास मोर्चा काढण्याचा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर कणकवलीसह जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील पोलीस पथके, दंगा काबू नियंत्रण पथक तैनात ठेवण्यात आले आहे.