You are currently viewing शोध सुखाचा

शोध सुखाचा

गझल मंथन, गझल प्राविण्य समूहाच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ शोभा वागळे यांचा अप्रतिम लेख

उत्कर्ष विद्या मंदिरचे पटांगण पालकांनी व विद्यार्थ्यांनी
गच्च भरलेले होते. त्याला कारणही तसेच होते. शाळेच्या वर्धापन दिनाचा सुर्वण महोत्सव होता. ह्या सोहळ्याला पंधरा वर्षांपुर्वी शाळेतून बोर्डाच्या परिक्षेत पहिली आलेली, तसेच शाळेतले अत्यंत आवडते शिक्षक देशपांडे सरांची मुलगी, आज एक प्रख्यात सर्जन होऊन प्रमुख पाहुणी म्हणून येणार होती.

शाळेचे मुख्याध्यापक, सारा शिक्षक वर्ग तसेच पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात आनंदाची कारंजी उसळत होती. रंगीबेरंगी पताका, फुलांच्या माळा, डोळे दिपवून टाकणारी प्रमुख पाहुणीच्या चित्राची सुशोभित रांगोळी तसेच सनईच्या मंजुळ स्वरांनी शालेय परिसर लग्न घरासारखाच वाटत होता.

नियमित शाळेत वेळेवर येणारी विद्यार्थिनी आज पाहूणी म्हणून आली ती सुध्दा वेळेच्या अगोदरच. त्यामुळे शिक्षकांसकट सर्वच चकित झाले. आगत स्वागत झाल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरूवात झाली. प्रथम यशश्री (पाहुणी विद्यार्थीनी) यांच्या हस्ते दीप प्रज्वलन, मग मुलांनी गोड सुरांनी केलेले शारदा वंदन, तदनंतर विज्ञान प्रदर्शनाचे उद्घघाटन यशश्रीच्या हस्ते झाले. मुख्याध्यापकांनी यशश्रीचा संक्षिप्त परिचय व तिच्या यशकार्याचे गुणगान केले. त्याचबरोबर आदर्श देशपांडे सरांचे ही कौतुक केले. तेव्हा सर्वांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले.

शेवटी यशश्री बोलायला उठल्या. त्यांनी मुलांना आपल्या शाळेतल्या आठवणी सांगून खूपच प्रोत्साहन दिले. त्यांच्या भाषणाने मुले पालक व शिक्षकगण चकित झाले. आपण शिक्षकांचे आवडते होण्यासाठी मोजक्या काही पद्धती सांगून खेळाच्या वेळी खेळ व अभ्यासाच्या वेळी अभ्यास कसा करावा हे ही त्यांनी सांगितले. जसे मुलाच्या अंगातले गुण शिक्षकांना कळतात तसेच आपल्या शिक्षकाला आपल्याकडून काय अपेक्षा आहेत हे ही मुलांना कळते व त्याप्रमाणे आपण वागलो तर गुरू शिष्याचे एक अतूट नाते निर्माण होते. तेच नाते मी जपल्याने आज तुमच्या समोर मी हजर आहे असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निमार्ण केले. पाहूणीच्या सत्कारा नंतर ईतर शिक्षकांनी आपल्या भाषणात यशश्रीच्या शालेय जीवनातल्या छान आठवणी सांगितल्या.

शेवटी आभारप्रदर्शनाच्या वेळी एका शिक्षकाने मुलांना सांगितले, “एक प्रख्यात सर्जन आज आपल्या शाळेत आल्या आहेत. पण मुलानो, तुम्ही सगळ्यांनीच बघितले असेल, त्यांनी शाळेत प्रवेश करताच गुरूजनांच्या पावलांना स्पर्शून विद्यार्थिनी म्हणून आशीर्वाद ही घेतले. ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. शाळेने व त्यांच्या पालकांनी केलेल्या संस्कारांचे देणे आहे”. हे ऐकून सर्वांनी टाळ्यांचा गजर केला.

सगळा कार्यक्रम आटोपल्यावर मुली सोबत देशपांडे सरही घरी परतले. गाडीने बाबांना घरी पोचवून यशश्री लगेच हॉस्पिटलमध्ये आपल्या रोजच्या ड्युटीला निघाली. आज एक मोठ ऑपरेशन करायचे होते तिला.

देशपांडे घरी आले. बायकोने कार्यक्रमाबद्द्ल विचारले आणि त्यांच्या तोंडाचा जो पट्टा सुरू झाला तो दुपारच्या जेवणाला स्वयंपाकीण बाईंनी हाक मारली तेव्हा थोढा मंदावला.

मिस्टर आणि मिसेस देशपांडे एक सुखी आनंदी कुटुंब होते. घरची थोडी शेती आणि दोघांची नोकरी त्यामुळे त्यांना संसारात काही अडचणी आल्या नाहीत. एक मुलगा व एक मुलगी दोघेही लहानपणापासून हुशार. नेहमी सगळ्या गोष्टीत नाव कमावणारी. जशी खाण तशी माती. आई वडील सुसंस्कृत तशीच मुले ही निपजली. सहसा असे फार पहायला मिळत नाही पण देशपांडे कुटुंब त्याला अपवाद होते.
मुलगा परेश परदेशात नोकरी करत होता. दोन वर्षातून एकदा एका महिन्यासाठी यायचा तेव्हा घरात दिवाळी दसरा व्हायचा.

यशश्रीने ही एम. एस. पदवी परदेशातून घेतली होती. पण तिला आपल्या देशातल्या बांधवांकरता काम करायचे होते, म्हणून उच्च शिक्षण घेऊन ती मायदेशात आली होती. मुंबईच्या लिलावती हॉस्पिटलमध्ये ती प्रख्यात सर्जन म्हणून नावलौकिकाला आली होती. पण तिचा ओढा पैसे कमावण्यापेक्षा समाज सेवेकडेच जास्त होता. म्हणून थोडे पैसे साठल्यावर तिने बाबांना सांगून त्यांच्या गावी एक हॉस्पिटल बांधण्याचा आपला विचार मांडला. समाजातील गरीब लोकांसाठीच आपला पेशा असावा असा तिचा मानस असल्याने तिच्या आईबाबांनी तसेच गावातल्या श्रीमंत- प्रतिष्ठित लोकांनी मदतीचा हात पुढे करून, सगळ्या रोगांवर निवारण करणारे एक भव्य हॉस्पिटल तयार करायचे असे ठरले.

त्याच्या बांधकामासाठी पैसा गोळा करण्यास बराच खटाटोप करावा लागला होता. पण म्हणतात ना, इच्छा तेथे मार्ग, त्याप्रमाणे सगळ्यांचा मदतीचा हात व देवाची साथ असल्याने हॉस्पिटलचे बांधकाम व्यवस्थित पार पडले. वेगवेगळे विभाग, त्यांची सगळ्या सोईची उपकरणे व डॉक्टर्स, सिस्टर्स, वॉर्डबॉय व ईतर स्टाफ अशी सगळी तयारी व्यवस्थीत झाली.

हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी लिलावतीचे डीन, तिच्या शाळेचे आजी माजी मुख्याध्यापक, गावची प्रतिष्ठित मंडळी, आईबाबा आणि गावकरी ही उपस्थित होते. साऱ्या गावात आनंदाचे वातावरण होते. जवळपास असलेले ते एकमेव हॉस्पिटल होते त्याचे सर्वांनाच कौतुक होते.

त्यातून गावातली वडीलधारी मंडळी यशश्रीवर आशीर्वादाचा वर्षाव करत होती. एवढी प्रख्यात सर्जन झाली तरी गावातल्या लोकांसाठी आपले शिक्षण उपयोगात आणते आणि ते ही आजच्या युगात याचे लोक तोंडभरून कौतुक करत होते.

गावातली मुले शिक्षण- नोकरीसाठी शहरात जातात व तिथेच स्थायिक होतात. तसेच परदेशात उच्चशिक्षणास अथवा नोकरीसाठी गेलेली मुले तिथलेच नागरिकत्व स्विकारतात. परत मायदेशी येण्याचे नाव काढत नाहीत. अशा परिस्थितीत यशश्रीसारखी शहरात वाढलेली मुलगी, परदेशात उच्च शिक्षण घेतलेली, पण गावकऱ्यांच्या सुखासाठी गावात स्थायिक झाली. त्यामुळे यशश्रीची व तिच्या हॉस्पिटलची दखल सगळ्या वृत्तपत्रांनी घेतली व मुखपृष्ठावर बातमी छापून प्रसिद्धीही दिली.

सुखाच्या कल्पना प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. प्रत्येकाचे सुख वेगळे असते. यशश्रीचे सुख गरजूंच्या, सामान्य जनतेच्या सुखात होते. तिच्या हॉस्पिटलमध्ये सवलतीच्या दरात पेशन्टच्या चाचण्या व उपचार केले जात होते. बऱ्याच समाज सेवी संस्थांनीही हॉस्पिटलला हातभार लावल्याने कमी पैशात
पेशन्टवर उपचार होत होते. हॉस्पिटलचे नाव ही ‘ग्रामसेवा हॉस्पिटल’ ठेवले होते आणि तेच यशश्रीचे सौख्य होते.

© शोभा वागळे
मुंबई
8850466717

प्रतिक्रिया व्यक्त करा