कार्यकर्त्यांना वाचविण्यासाठी नारायण राणे यांनी कधी असे मोर्चे काढण्याचे इशारे दिलेत का?
सावंतवाडी
एका केंद्रीय मंत्र्याला आपल्या मुलाला वाचविण्यासाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा द्यावा लागतो यातच नारायण राणे यांची हतबलता दिसून येते, ही सर्व मुलाला वाचविण्यासाठी धडपड आहे असा आरोप मनसेचे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत केला.
या मुख्य आरोपीला दिल्लीहून अटक करण्यात आली आहे, तो आरोपी कोणाच्या सोबत असतो? त्याच्यावर यापूर्वी कोणकोणते गुन्हे दाखल आहेत? ही सर्व माहिती पोलिसांना आहे,पोलिसांनी अगदी शिताफीने या आरोपीला ताब्यात घेतले त्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, व धाबे दणाणले आहेत.
आमदार नितेश राणे यांना याप्रकरणी कधीही अटक होऊ शकते म्हणून नारायण राणे यांनी सुडाचे राजकारण करून आमदार नितेश राणे यांना त्रास दिल्यास पोलीस ठाण्यावर मोर्चा काढू असा इशारा दिला आहे, यापूर्वी नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यात अटक झाली, तेव्हा राणे यांनी असे मोर्चे काढले का असा खोचक सवाल माजी आमदार उपरकर यांनी केला आहे.