सिंधुदुर्गनगरी
कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन प्रकार जगभरात वेगाने पसरत आहे. राज्यातही कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यासाठी अतिरिक्त निर्बंध लागू करण्याचे आदेश आज दिले आहेत.
या आदेशात म्हटले आहे. शासनाने, कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन प्रकार सद्यस्थितीत जगभरात वेगाने पसरत असून, गेल्या काही दिवसात राज्यात ओमिक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव झालेले रुग्ण आढळले असून, मागील आठवड्यात राज्यात दररोज 1000 हून अधिक कोरोना – 19 बाधित रुग्णांची नोंद होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच आगमी नाताळ सण, लग्नसराई, तसेच नवीन वर्षाच्या समारंभाच्या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसात सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने, कोरोना विषाणूचा ऑमिक्रॉन प्रकार अधिक फैलावण्याची शक्यता असल्याने, ओमिक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव रोखणयासाठी सद्यस्थितीत लागू असलेले निर्बंध कायम ठेवून त्याव्यतिरिक्त आणखी निर्बंध लागू केले आहेत.
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता कोविड – 19 – ओमिक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता निर्बंध लावण्याच्या संबंधातील सद्यस्थितीतील निर्बंध कायम ठेवून पुढील अतिरिक्त निर्बंध पुढील आदेशपावेतोपर्यंत संपूर्ण जिल्ह्यासाठी लागू करीत आहे.
1) नाताळ सण साजरा करण्याच्या बाबतीत, गृह विभागाच्या परिपत्रकात निर्देशित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून नाताळ सण साजरा केला जाईल.
2) लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहामध्ये एकावेळी जास्तीत जास्त 100 लोकांना परवानगी असेल आणि मोकळ्या जागेत जास्तीत जास्त 250 किंवा त्या जागेच्या प्रत्यक्ष क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल एवढ्या लोकांना परवानगी असेल.
3) इतर सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्ये आणि मेळाव्याच्या बाबतीत, उपस्थितांची उपस्थिती बंदिस्त सभागृहासाठी एकावेळी जास्तीत जास्त 100 आणि मोकळ्या जागेत जास्तीत जास्त 250 किंवा त्या जागेच्या प्रत्यक्ष क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल एवढी असेल.
4) वर नमुद कार्यक्रमाव्यतिरिक्त इतर कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसन क्षमता निश्चित आहे अशा ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्केपेक्षा जास्त नसेल. तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी 25 टक्के उपस्थिती असेल. अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमामध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या 25 टक्केपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
5) क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या 25 टक्क्यापेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
6) वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात त्या – त्या विभागातील उपविभागीय अधिकारी त्या ठिकाणची उपस्थितांची संख्या किती असेल हे निश्चित करेल. असे करताना दि. 29 नोव्हेंबर 2021 रोजी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी देण्यात आलेल्या आदेशांमधील निर्बंधांचे पालन होईल याची दक्षता घेण्यात यावी.
7) उपहारगृहे, व्यायामशाळा, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी त्यांना परवाना/परवानगी दिलेल्या अधिकारी यांनी ठरवून दिलेल्या क्षमतेच्या 50 टक्के एवढी उपस्थिती राहील. सदर आस्थापनांनी अपली संपूर्ण क्षमता तसेच 50 टक्के क्षमतेची संख्या ठळकपणे जाहीर करण्यात यावी.
8) सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत बंदी असेल.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती / आस्थापना शासनाने यापूर्वी लागू केल्यानुसार दंडात्मक कारवाईस, तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188,269,270,271 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 सह अन्य तरतुदीनुसार फौजदारी शिक्षेस पात्र राहील.