सावंतवाडी :
जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कॉलेजमार्फत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे यंदा सलग सहावे वर्ष असून चालूवर्षीही हा दिवस सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट आणि असोसिएशनच्या सहकार्याने साजरा करण्यात आला. कोविड – १९ च्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टंसिंगच्या सर्व नियमांचे पालन करुनच हा कार्यक्रम पार पडला. कोरोना साथीच्या कालावधीत फार्मासिस्ट व्यावसायिकांचे योगदान फार मोठे आहे. त्यामुळे याविषयीची कृतज्ञता म्हणून उपस्थित सर्व फार्मासिस्ट व्यावसायिकांचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील फार्मसी क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या व्यक्तिमत्त्वाचा दरवर्षी ‘फार्मसिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार देऊन कॉलेजतर्फे गौरव केला जातो. यावर्षी शिरोडा येथील फार्मासिस्ट आणि व्यावसायिक कमरुद्दिन शेख यांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अच्युत सावंतभोसले आणि जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी झूम व युट्युब सारख्या ऑनलाईन माध्यमांद्वारे उपस्थित होते. फार्मसी क्षेत्राविषयी माहिती देणाऱ्या विविध ई-मॅक्झिन्स, ई-ब्रोशर्स व न्यूज लेटर यांचे डिजिटल उदघाटन यावेळी करण्यात आले. दुपारच्या सत्रात विद्यार्थी व शिक्षक वर्गासाठी परदेशी शिक्षणाच्या संधी या विषयावर इंटरनॅशनल वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.