कुडाळ :
गणित हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. आयुष्याच्या सुरुवातीपासून ते अंतापर्यंत गणित वर्ज्य करता येत नाही. गणित हा अतिशय बुद्धिवर्धक सोपा विषय आहे. त्याची भीती न बाळगता त्याच्याकडे चालेंज म्हणून पाहिल्यास बुद्धीचा कस लागतो .सर्व विषयांचा गणित हा पाया आहे. तो ज्याचा भक्कम आहे. तो जीवनात बुद्धिजीवी कामांना समर्थपणे सामोरा जाऊ शकतो. गणिती ठोकताळे भविष्यातील नियोजनसाठी महत्त्वाचे असतात. भविष्यातील काम यशस्वी करता येतात .म्हणून आयुष्याच गणित ज्याला चांगल्या पद्धतीने सोडवता आलं तोच जीवनात यशस्वी होऊ शकतो.तोच आनंदी जीवन जगू शकतो.”असे उद्गार कुडाळ हायस्कूलचे निवृत्त प्राचार्य आनंद जामसंडेकर यांनी काढले .ते बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये गणित दिनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
भारतीय गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा २२ डिसेंबर जन्मदिन प्रत्येक वर्षी “राष्ट्रीय गणित दिन” म्हणून साजरा केला जातो. शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी लागावी तसेच गणितीय दृष्टीकोन विकसित व्हावा यासाठी गणित दिनानिमित्त प्रशाळेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.
या वर्षी देखील सी. बी. एस. ई.प्रशाळेमध्ये गणित दिनानिमित्त प्रदर्शनाचे आयोजन केले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन कुडाळ हायस्कूलचे माजी प्राचार्य व गणित प्रेमी अनंत जामसंडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मुलांनी गणित विषयाचे विविध प्रमेय, गणित पद्धती, गणित अभ्यास, गुणाकार, भागाकार यांची अन्वर्थक अशी मॉडेल्स तयार केली होती.ही प्रदर्शन बघून जामसंडेकर यांनी मुलांचे कौतुक केले. या वेळी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या मीना जोशी , उपप्राचार्या कल्पना भंडारी, फिजिओ थेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुरज शुक्ला , बॅरिस्टर महिला महाविद्यालय व रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, बी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य परेश धावडे , गणित विषयाचे नचिकेत देसाई, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.