*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सदस्या राष्ट्रीय पुरस्कारित ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांचा अप्रतिम लेख*
“खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ….”
जगाच्या कोणत्याही धर्मग्रंथात तुम्हाला धर्माची इतकी सोपी
व्याख्या व इतका सुलभ अर्थ सापडणार नाही .. किती खरं
आहे .. अहो प्रेम जिथे आले तिथे सारे प्रश्नच संपतात ..
काही करण्याची गरजच उरत नाही . प्रेमापोटी न सांगताच
साऱ्या गोष्टी घडतात . प्रेम न सांगताच सारे काही घडवून
आणते.हे खरे मानवतेवरचे उदात्त आणि उदार प्रेम आहे .असे
प्रेम फक्त हळव्या मनाची माणसेच करू शकतात.कारण
माऊलीने संस्कारच तसे केले होते … पावलांना माती लागू नये
म्हणून पदरावर पाऊले झेलणारी ती माऊली म्हणते …
“मनाला मळ लागू नये म्हणून असेच जप बरं श्यामबाळा”
आणि उभ्या आयुष्यात श्यामच्या मनाला मलीनाने कधी ही स्पर्श केला
नाही .
गरीबीत खस्ता काढत आयुष्य गेल्यामुळे गरीब व गरीबीशी
त्यांचा चांगलाच परिचय होता.हे चटके कुटूंबातील साऱ्याच
सदस्यांना बसत होते. म्हणून शाळेत ही मैलोन् मैल चालत
जावे लागे. लहान भावाला कोट हवा होता पण कसे शक्य
होते ते ? वडील ही ठीगळ लावून कपडे वापरत ते ह्या असल्या
मागण्या पुरवूच शकत नव्हते. मग श्यामने आपल्याला मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशात बचत करून एका सुटीत कोट शिवून घेऊन तो …
भिजू नये म्हणून डोक्यावर घेऊन नदी पार करत कोट
घरी आणून लहानग्या भावाला दिला … कुठली उपमा देणार
हो तुम्ही या प्रेमाला …? छे…! खरंच शब्द नाहीत …
जे प्रेम कुटुंबावर … तेच प्रेम देशावर करणारा माणूस अत्यंत
विरळा.. ते साने गुरूजीच करू शकतात .
“ काय म्हणतात ….
“ बलसागर भारत होवो.. विश्वात शोभूनी राहो”
माझा भारत देश बलसागर तर झालाच पाहिजे पण …
तो “ साऱ्या विश्वात उठून दिसला पाहिजे”
वा .. किती उदात्त भावना ..असे प्रेम जर प्रत्येक देशवासियाने
केले तर … देश कसा सुखी होणार नाही ..? ह्या लोकांना मुळी
देशाला देण्याचीच प्रवृत्ती होती, घेण्याची नाही ..
आणि आमची फक्त घेण्याची वृत्ती आहे .. देण्याची नाही”
अशाने कसे भले होणार देशाचे …? स्वातंत्र्यासाठी जे लढले
ती सारी पिढी ह्याच मनोवृत्तीची होती..म्हणून ते देशासाठी
लढता लढता प्राणांचे बलिदान करून गेले व नाव ठेवून गेले.
आपल्या प्राणांचे बलिदान करून मुक्त केलेला देश ते आपल्या हाती सोपवून गेले पण तोही आम्हाला नीट सांभाळता
येत नाही …!
असे होते साने गुरूजी …
देशासाठी उत्तम लिहिणारे .. देशाची काळजी करणारे .. मुलांच्या मनावर संस्कारक्षम वाड्.मय निर्माण करणारे. त्यांचा
एकएक शब्द म्हणजे कमळाच्या नाजुक पानांवर रक्ताच्या
अश्रूंनी लिहिलेल्या प्रेमाच्या नाजुक हळव्या कळ्या आहेत..
हळूवारपणे हाताळल्या नाहीत तर उमलण्यापूर्वीच कोमेजणाऱ्या….! माणसाने इतकं हळवं असू नये .. पण ते तरी
कुठे आपल्या हातात आहे ?
म्हणूनच ह्या नाजुक कवीमनाच्या माणसावर , सानेगुरूजींवर मृत्यू लेख लिहितांना अत्र्यांची लेखणी अशी काही हळवी झाली आहे
नि अशी काही शब्दसंपत्ती अत्र्यांनी मुक्तहस्ते उधळली आहे की तो मृत्यूलेख वाचून रडला नाही असा माणूस सापडणे
दुर्मिळच …! अत्र्यांनी लिहिलेले सारेच मृत्यूलेख कमालीचे
भाषासिद्ध आहेत तरी हा लेख काही वेगळांच नि अत्र्यांचं
भाषा प्रभुत्व दाखवणारा आहे . तसे अत्रे भाषा प्रभू होते हे
आपण जाणतोच ….साने गुरूजींविषयी बोलावे तेवढे थोडेच
आहे.. अशी माणसे शतकातून एकदाच जन्मतात …
पुन्हा पुन्हा नाही …म्हणून तर शिवाजी महाराज, राणाप्रताप
एकच होतात …व साने गुरूजीही एकच होतात …
त्यांना शत शत प्रणाम ….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : २५ डिसेंबर २०२१
वेळ : संध्या . ४ :३२