सावंतवाडी नगरपालिका आणि देवगड नगरपंचायतीवर गुरुवारपासून प्रशासक बसणार
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि नगरपालिका हद्दीत वाढीव सदस्य संख्येमुळे प्रभागांची फेररचना यांमुळे नगरपालिका निवडणूका लांबणीवर पडल्या आहेत. दरम्यानच्या काळात या नगरपालिकांची मुदत संपत आल्याने याठिकाणी प्रशासक बसवण्याचा सूचना नगरविकास खात्याने दिल्या आहेत. त्यानुसार मालवण आणि वेंगुर्ले नगरपालिकेवर उद्या (बुधवार) पासून तर सावंतवाडी नगरपालिका आणि देवगड नगरपंचायतीवर गुरुवार पासून प्रशासक बसणार असल्याची माहिती नगररचना विभागाकडून देण्यात आली आहे.
कोरोनामुळे निवडणूका पुढे गेल्या आहेत. तर शासनाने नगरपालिकांची सदस्य संख्या १७ वरून २० केल्याने पुन्हा प्रभागांची रचना करावी लागणार आहे. त्यामुळे नगरपालिकांच्या निवडणूका किमान एक ते दीड महिना लांबणीवर गेल्याची चिन्हे आहेत. मात्र या नगरपालिकांचा कार्यकाल संपत आल्याने याठिकाणी प्रशासक बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मालवण व वेंगुर्ला याठिकाणी उद्यापासून तर सावंतवाडी पालिकेवर गुरुवार पासून प्रशासक बसणार आहे. देवगड नगरपंचायतीचा कार्यकाळ संपत असल्याने त्याठिकाणी देखील गुरुवार पासून प्रशासक बसणार आहे. नगरपालिकांवर उपविभागीय अधिकारी तर नगरपंचायतीवर तहसीलदार यांच्याकडे पदभार दिला जाणार आहे. त्यामुळे विद्यमान नगराध्यक्ष व नगरसेवकांचा कार्यकाल येत्या दोन दिवसांत संपणार आहे.