आशा रणखांबे प्रतिनिधी
‘अंतरंग मनाचे’ या पहिल्याच पुस्तकाने साहित्य विश्वाचे लक्ष वेधून घेणाऱ्या लेखक श्रीकांत कवळे यांना बृहन्मुंबई पेंशनर्स असोसिएशनतर्फे ज्ञानपीठ विजेते साहित्यिक ‘वि. स.खांडेकर पुरस्काराने’ नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते दादर – माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात नुकतेच गौरविण्यात आले. या कार्यक्रमात ‘पेंशनर्स डे’ निमित्त अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी कवयित्री डॉ. सुचिता पाटील, वक्त्या यामिनी पानगावकर यांनाही गौरविण्यात आले.
गेली अनेक वर्ष साहित्याची आवड जोपासणाऱ्या श्रीकांत कवळे विविध सामाजिक विषयावर चौफेर लेखन करीत आहेत. नायब तहसीलदार म्हणून आपली कामगिरी चोख बजावत असून जनसामान्यांची सेवा हीच परमेश्वराची सेवा हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात कारावास भोगलेले स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय पांडुरंग कवळे यांचे ते सुपुत्र असून महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात गेली तीस वर्षे ते कार्यरत आहेत. मुंबईच्या शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या “अंतरंग मनाचे” या पुस्तकाचे प्रकाशन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अलिबाग येथे झाले आहे. या पुस्तकाचे रसिक वाचकांनी आवर्जून कौतुक केले आहे. सतत सकारात्मक विचार ललित लेखनाच्या माध्यमाद्वारे समाज माध्यमातून मांडून सामाजिक बांधीलकी जपणारा अधिकारी अशी त्यांची जनमानसात ओळख आहे.
अनेक वृत्तपत्र, दिवाळी अंक यामधून ललितबंध, कथा, कविता यांचं सातत्याने लेखन सुरू आहे. शांत, समंजस, लोभस व्यक्तिमत्त्व लाभलेला आणि माणूसकी जपणारा माणूस म्हणून अधिक परिचित आहेत. या अतिशय महत्त्वाच्या पुरस्कारामुळे लेखक म्हणून माझी जबाबदारी अधिक वाढली असून मी अधिक सजगतेने लेखन करणार असल्याचा मनोदय श्रीकांत कवळे यांनी व्यक्त केला.