You are currently viewing “ती” थकीत रक्कम भरा, आपण जिल्हा बँक निवडणुकीतून माघार घेवू – एम.के.गावडें

“ती” थकीत रक्कम भरा, आपण जिल्हा बँक निवडणुकीतून माघार घेवू – एम.के.गावडें

ओरोस

जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुग्ध उत्पादक संघाचे अध्यक्ष व जिल्हा बँकेचे उमेदवार असलेल्या एम.के.गावडे यांनी आज नारायण राणेँना “गुगली” टाकली आहे. दुग्ध उत्पादक संघाची एका दूध कंपनीकडे थकीत असलेली २ कोटी ७७ लाखाची रक्कम केंद्रीय मंत्री राणेंनी उद्यापर्यंत भरल्यास आपण निवडणुकीतून माघार घेऊ, असे त्यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी भाजपचे नेते तथा आमदार नितेश राणे यांना पत्र दिले.

जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे २ कोटी ७७ लाख रुपये कोरोली येथील प्रतिभा दूध प्रक्रिया उद्योग कंपनीने दिलेले नाहीत. अनेक वर्षे पाठपुरावा करून सुद्धा हे पैसे न मिळाल्याने १६ नोव्हेंबर २०२१ रोजी झालेल्या नियोजन मंडळाच्या बैठकीच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा दूध संघाचे पदाधिकारी उपोषणाला बसले होते. या उपोषण स्थळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भेट दिली होती. या भेटीत गोरगरीब दुध उत्पादकांचे २ कोटी ७७ लाख आपण स्वतः देण्याचे मान्य केले होते. परंतु सदरची रक्कम आज पावेतो प्राप्त झालेली नाही.
जिल्ह्यातील गोरगरीब दुध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्यासाठी आपण सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या २०२१-२०२६ च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मतदार संघ क्र. ८-३० (१) क (४) संलग्न मच्छीमार संस्था, सर्व दुग्ध संस्था (उत्पादक आणि व्यावसायिक), कुक्कुटपालन, वराहपालन, जनावरे पैदास करणाऱ्या संस्था या मतदार संघातून निवडणुकीला उभा राहिलो आहे.
ही निवडणूक मी जो उद्देश ठेऊन लढवीत आहे, त्या गोरगरीब दुध उत्पादकांचे २ कोटी ७७ लाख उद्या दुपारी १ वाजेपर्यंत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी दिलेल्या शब्दा प्रमाणे जमा केलेत, तर मी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमधील मतदार संघ क्र. ८-३० (१) क (४) संलग्न मच्छीमार संस्था, सर्व दुग्ध संस्था (उत्पादक आणि व्यावसायिक), कुक्कुटपालन, वराहपालन, जनावरे पैदास करणाऱ्या संस्था या मतदार संघातून माझी उमेदवारी मागे घेण्यास तयार आहे, असे पत्रात नमूद केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा