You are currently viewing गड किल्ल्यांच्या हरेक पत्थराने…

गड किल्ल्यांच्या हरेक पत्थराने…

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ राखी जोशी यांची काव्यरचना

गड किल्ल्यांच्या हरेक पत्थराने
केले असेल मूक आक्रंदन
आपसूकच गहिवरून आले आज
प्रत्येक मराठी माणसाचे मन

खुद्द इतिहासही कदाचित
स्वर्गदारी असेल धावत आला
पद्मविभूषण इतिहास पुत्राच्या
यथोचित अशा स्वागताला

काय असते वेडात जगणे
अन् ध्येय ध्यास कशास म्हणता
एकवार बघावा युगपुरुष
घ्यावा समजून राजा जाणता

व्याख्यानातून जीवंत केले
मनामनात ज्यांनी छत्रपती
आयुष्य जगले झपाटल्यागत
दिली साहित्याची श्रीमंती

शिवसृष्टी चे स्वप्न मोठे
पूर्ण आता होत आहे
बळ तुमच्याच स्मृतींचे
शिवभक्तांना देत आहे

पैसा, प्रसिध्दी यांच्या पाठी
धावले ना कधीच तुम्ही
तरीही अधिराज्य केले आहे
मराठी मनावर कायम तुम्ही

देणगी अफाट स्मरणशक्तीची
वर होता तारुण्याचां
चार पिढ्यांना दिला वारसा
जाज्वल्य मराठी अभिमानाचा

खेळ जिंकला नियतीने
पुन्हा एकदा मनासारखा
बाबासाहेब मुजरा आमुचा
स्वीकारावा मानाचा

कोळसा नको चंदन उगाळा
आयुष्याचे सोने करा ना
मंत्र तुमचा स्वीकारून आम्ही
जोडीतो या दोन्ही करांना🙏

मनात ठेवून प्रतिमा जागृत
वाहतो भाव सुमनांजली
महाराष्ट्र भूषण तुम्हा आमची
भावपूर्ण श्रद्धांजली

राखी जोशी

प्रतिक्रिया व्यक्त करा