केंद्रीय मंत्री नारायण राणे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती…
वेंगुर्ले
नगरपालिकेच्या कॅम्प येथील “नाटककार मधुसूदन कालेलकर बाहुद्देशिय सभागृह व शॉपिंग मॉल” चे उद्घाटन १९ डिसेंबरला भव्य-दिव्य कार्यक्रम करून होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री उदय सामंत यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याच अंतर्गत १९, २०, २१ डिसेंबर असा तीन दिवसीय “आरंभ उत्सव” साजरा होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नगराध्यक्ष श्री. गिरप म्हणाले की, नाटककार मधुसूदन कालेलकर बाहुद्देशिय सभागृह व शॉपिंग मॉल हा वेंगुर्ला नगरपरिषदेचा या ५ वर्षातील सर्वात मोठा प्रकल्प असून याचा भव्य लोकार्पण सोहळा होणार आहे. यात १९ रोजी नाटककार मधुसूदन कालेलकर बाहुद्देशिय सभागृह, शॉपिंग मॉल इमारत, संपूर्ण ४० व्यापारी गाळे याचे लोकार्पण दुपारी १ वाजता होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाला खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, वैभव नाईक, निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, जिल्हाधीकरी के. मजुलक्ष्मी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर रात्री ९ वाजता “बेधुंद क्षण” सेलिब्रिटी गायकांचा बहारदार “ऑर्केष्टा” होणार असून रचित अग्रवाल, प्रियांशी श्रीवास्तव या गायकांसहीत १५ ते १६ वाद्यवृंद यांचा असणार यात सामावेश आहे.
२० डिसेंबरला संध्याकाळी ५ ते ७ यावेळेत वेंगुर्ला न.प. प्रशासनातील कर्मचारी यांचा सन्मान सोहळा तसेच या ५ वर्षाच्या कारकिर्दीत लाभलेले मुख्याधिकारी रामदास कोकरे, वैभव साबळे व डॉ अमितकुमार सोंडगे यांचाही नगरपरिषद नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षा व सर्व नगरसेवक यांच्या वतीने सत्कार होणार आहे. त्यानंतर नगरपरिषद मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ, शूटिंग, स्विमिंग, रनिंग व लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा आदींच बक्षीस वितरण करण्यात होणार आहे. याच दिवशी सायंकाळी ७ वाजता रवींद्र देवधर यांचे “मी भारतीय” ही द्वीपात्री नाटिका होणार असून रात्री ९.३० वाजता कवी आरती प्रभू रंगमंचाचे मधुसूदन कालेलकर यांचे पुत्र अनिल कालेलकर यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. त्यानंतर लक्ष्मी प्रोडक्शन निर्मित जनार्दन लवंगारे दिग्दर्शित “बायको कमाल मेहुणी धमाल” हे कॉमेडी नाटकही सादर होणार आहे.
२१ रोजी संध्याकाळी ६ ते ८ वाजता जादूगार जितेंद्र रघुवीर यांचे जादूचे प्रयोग आणि रात्रौ ९.३० वाजता दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. असा ३ दिवसीय भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले आहे. यावेळी उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, गटनेते सुहास गवंडळकर, नगरसेवक प्रशांत आपटे, प्रशासकीय अधीक्षक संगीता कुबल, मखावेकर आदी उपस्थित होते.