You are currently viewing जिल्ह्यात कुडाळ देवगड वैभववाडी दोडामार्ग नगरपालिकेत मतदानाचे वारे

जिल्ह्यात कुडाळ देवगड वैभववाडी दोडामार्ग नगरपालिकेत मतदानाचे वारे

सावंतवाडी नगरपालिका मात्र चर्चेत…

संपादकीय….

सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड वैभववाडी कुडाळ दोडामार्ग नगरपालिकांमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले असून मतदानाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्याच दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचा धुरळा सुद्धा पहायला मिळत असून नाराजांचे पक्ष बदल आणि निवडणुकीचे तिकीट पदरात पाडून घेण्यासाठीचा संघर्ष दिसून येत असून प्रत्येक पक्ष मजबूत उमेदवार मैदानात उतरताना दिसत आहेत.
जिल्ह्यातील इतर नगरपालिकांमध्ये निवडणुकांचे वारे वाहत असले तरी काही महिने लांबणीवर निवडणूक असलेल्या सावंतवाडीत मात्र वादळ सदृश्य स्थिती असून सावंतवाडीकर जनता कोणाला झुकतं माप देणार याचीच चर्चा जास्त होताना दिसत आहे. दीपक केसरकर यांची २३ वर्षांची सावंतवाडी पालिकेतील सत्ता बबन साळगावकर यांच्या बंडा नंतर केसरकर यांच्या हातून निसटली आणि भाजपाचे कमळ पहिल्यांदा राणे समर्थक संजू परब यांच्या रुपात फुलले. केसरकर यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत शहराचा कायापालट केला होता, त्यांच्यानंतर सौ पल्लवी केसरकर, श्वेता शिरोडकर, आदी नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या. त्यांनीही शहर विकासाचा महामेरू केसरकरांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पेलला होता. परंतु केसरकरांकडून झालेल्या विकासाचा वेग इतरांना घेता आला नाही, पर्यायाने शहर विकास खुंटल्याची भावना शहरवासीयांची झाली. त्यामुळे शहरवासीयांना सावंतवाडी पालिकेत तेच तेच चेहरे नको म्हणत आमदार नितेश राणे यांच्या वचनांवर विश्वास ठेवत मूळ मडुरा गावातील परंतु शिक्षण सावंतवाडीत झालेल्या संजू परब यांच्यावर विश्वास टाकत नगरपालिकेच्या सत्तेची दोरी भाजपाच्या पर्यायाने नारायण राणे, नितेश राणे यांच्या नेतृत्वाखालील संजू परब यांच्या हाती सोपविली. माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नानी सावंतवाडीत पालिकेत सत्ता आली परंतु संजू परब रवींद्र चव्हाण यांच्या जास्त जवळ राहिल्याने अथवा इतर काही कारणांनी नितेश राणे यांनी सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत दिलेली वचने केवळ आश्वासानेच ठरली आणि सध्यास्थितीत माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील सावंतवाडी पालिकेकडे दुर्लक्ष केल्याने सावंतवाडी शहराचा विकास हा बोलचीच कडी आणि बोलचाच भात असाच प्रकार झाला.
फक्त ७२० दिवस सत्ता द्या शहराचा विकास काय असतो हे दाखवून देऊ असे म्हणत सावंतवाडी शहराला २४ तास पाणी, कंटेनर थिएटर, भुयारी गटार, चांगले रस्ते, कचरा प्रकल्प, बंदावस्थेत असलेल्या प्रकल्पांना चालना देणे अशी एक ना अनेक आश्वासने सावंतवाडीकरांना देण्यात आली होती. पण खरंच यातील किती आश्वासने सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी पूर्ण केली? खरोखर दिलेल्या वचनांना सत्ताधारी जागले का? हा खरा प्रश्न आज सावंतवाडी वासीयांना पडला आहे. शहरात आजपर्यंत कधीच पाण्याची बोंबाबोंब पडली नव्हती परंतु यावर्षी डिसेंबर पर्यंत पाऊस सुरू असतानाही दिवाळीची आंघोळ देखील उभाबाजार परिसरात टँकरच्या पाण्याने झाली. शहरात पिण्यासाठी देखील वेळेवर पाणी येत नाही, चुकीच्या पद्धतीने पूर्वम्पार चालत आलेली पाणी वाटप वेळ बदलल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे. कंटेनर थिएटर हे स्वप्नात राहिले आणि आज शहराच्या नजिक मल्टिप्लेक्स झाल्याने शहरवासीयांना त्याचं अप्रूप देखील राहिलं नाही. शहरात होणारा डासांचा उपद्रव पूर्वी फवारणी, धूर फवारणी वगैरे करून कमी केला जायचा. परंतु गेल्या काही वर्षात ती दूर फवारणी यंत्रे संशोधनाचा विषय बनली आहेत. भुयारी गटार ही महत्त्वाकांक्षी योजना सत्तेत येताना घोषणा केलेली परंतु त्या घोषणेची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही, त्यामुळे भुयारी गटार ही बोलण्यातलीच संकल्पना होती हे समोर आले आहे.
दीपक केसरकर यांनी वॉर्डा वॉर्डात फिरून तेथील ड्रेनेजचे पाणी प्रत्येक वार्डमध्ये फिल्टरेशन प्लांट उभारून स्वच्छ करून गार्डन साठी पुनर्वापर करणे अशाप्रकारे योजना आणण्याची तयारी केलेली कारण खर्चिक असणारी भुयारी गटार योजना नागरिकांवर कराचा बोजा वाढवणारी ठरली असती, परंतु त्या योजनेला देखील मूर्त स्वरूप कोणीही आणू शकले नाहीत. शहरातील रस्त्यांची अवस्था तर बिकट आहे, कामतनगर जवळून जाणारा जुना बाजार रस्ता, खुद्द नगराध्यक्षांच्या वॉर्डात जाणारा साधले मेस कडील रस्ता, भोसले उद्यानाच्या बाजूने जाणारा बागकर रस्ता, कंटक पाणंद, तारा हॉटेल समोरचा रस्ता असे अनेक रस्ते नावपूरतेच डांबरीकरण राहिलेत, त्यात जिओ च्या केबलसाठी झालेल्या खोदाईमुळे जिकडेतिकडे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. बंद अवस्थेत असलेला हेल्थफार्म, रघुनाथ मार्केट आदी प्रकल्प, संगीत कारंजा आजही बंदच आहेत, शिल्पग्राम तेवढा एक प्रकल्प भाडेतत्वावर चालविणास दिला आहे, परंतु तो देखील माजी सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळातच. शहरात सुसज्ज मासळी मार्केट असून देखील शहरात प्रत्येक रस्त्यावर, पानंदीत, थिएटर जवळ, एसटी स्टँड जवळ, सालईवाड्यात टोपल्या घेऊन मासे विक्रीसाठी विक्रेते बसल्याने मासळी मार्केटमध्ये बसणाऱ्या लोकांकडून कर घेऊन त्यांच्यावर अन्याय होत असल्याने त्यांची नाराजी आहे. फुकट मासे मिळत असल्याने जागोजागी विक्रेत्यांना बसायला देतात असे आरोप होत आहेत, त्यामुळे शहराचं मासळी मार्केट झाल्यासारखी परिस्थिती आहे.
भाजी मार्केट मधील बाहेर बसणारे विक्रेते हटवून भाजी मार्केटने मोकळा श्वास घेतला होता, परंतु किती दिवस? जोपर्यंत तिथे नवीन मॉल होणार असे वारे वाहत होते तोपर्यंतच, त्यानंतर परिस्थिती जैसे थी झालेली असून पुन्हा एकदा सात मजली भाजी मार्केटसहित इमारत होणार अशी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धूळ उडत आहे. वेंगुर्ला शहराचे झालेले शहरीकरण आणि शिस्तबद्ध विकास पाहता सावंतवाडी विकासाच्या बाबतीत मागे का राहिली? असा प्रश्न आज उपस्थित होत आहे.
सावंतवाडी मोती तलावाच्या अर्ध्या भागातील फुटपाथचे काम दोन वर्षांपूर्वी साळगावकर नगराध्यक्ष असताना पूर्ण झाले होते, परंतु पॉम्पस समोरील नादुरुस्त पेव्हर ब्लॉक काढून आज दीड वर्षं लोटले तरी त्यावर दुसरे पेव्हर ब्लॉक अथवा त्याची दुरुस्ती देखील केलेली नाही, त्यामुळे तलावाच्या काठावर मॉर्निंग वॉक करणार्यांना रस्त्यावरून फिरण्याची पाळी येते. तळ्याकाठी बसवलेल्या बाजारामुळे तळ्याकाठी बसवलेले पथदीप मोडून पडले, त्यामुळे शहर सुशोभीकरणापेक्षा विद्रुपीकरण होताना दिसून येत आहे. फुटपाथवर जागोजागी भाजी व्यापाऱ्यांनी ताडपत्री बांधण्यासाठी घेतलेले चाऱ्याचे दगड पडलेले आहेत.
शहराची झालेली दुरवस्था पाहता माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शहराच्या राजकारणात लक्ष घातल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक वॉर्डात होतकरू, नव्या जोमाचे उमेदवार देण्यासाठी ते चाचपणी करताना दिसून येत आहे. आज आमदार म्हणून मोठेपणा न ठेवता जनतेच्या दरबारात गेल्याशिवाय किंमत राहत नाही आणि लोकांच्या दारी गेल्यावर आपली किंमत कमीही होत नाही असाच पवित्रा केसरकर यांनी घेतल्याने भविष्यात सावंतवाडी नगरपालिकेतील सत्तासंघर्ष नक्कीच पाहण्यासारखा असेल यात शंकाच नाही…सावंतवाडी वासीय दीपक केसरकर यांच्यासारख्या सावंतवाडी शहराची संस्कृती जपणाऱ्याना थारा देतात की बदल घडूनही संधीचे सोने न करता आलेल्या नव्या दमाच्या संजू परब यांच्याच पारड्यात आपले वजन टाकतात हे लवकरच दिसून येईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा