लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा ; जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे आवाहन..
सिंधुदुर्गनगरी
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पिवळे, केशरी, अंत्योदय, अन्नपुर्णा व पांढरे शिधापत्रिका धारक शेतकरी, नोंदणीकृत बांधकाम कामगार तसेच निवडक लाभार्थी कुटुंबांना विविध गंभींर अजारांवर मोफत उपचार दिले जातात. जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले. या योजनेच्या अंबलबजावणीसाठीच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीवेळी त्या बोलत होत्या.
या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. नांद्रेकर यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जन आरोग्य योजना जिल्ह्यातील एकूण 13 रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. त्यामध्ये 6 सरकारी व 7 खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे. सराकरी रुग्णालय पुढील प्रमाणे आहेत. जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग, उपजिल्हा रुग्णालय, कणकवली, उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी, उपजिल्हा रुग्णालय, शिरोडा, ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ला, गोवा वैद्यकीय महाविद्यालय, गोवा. तर खासगी रुग्णालये पुढीलप्रमाणे आहेत. कणकवली येथील गुरूकृपा हॉस्पिटल, डॉ. नागवेकर हॉस्पिटल, संजीवनी हॉस्पिटल, साईलीला हॉस्पिटल, नाटळ, कुडाळ तालुक्यातील एस.एस.पी.एम. मेडिकल कॉलेज ॲन्ड लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे, सुयश हॉस्पिटल. सावंतवाडी येथील संजीवनी बालरुग्णालय यांचा समावेश आहे.
या दोन्ही योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात 1 एप्रिल 2021 पासून 11 डिसेंबर 2021 रोजीपर्यंत 2 हजार 580 शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले आहेत. त्यामध्ये एकट्या जिल्हा रुग्णालयामध्ये 602 व्यक्तींवर उपचार करण्यात आले आहेत.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत निवडक लाभार्थी कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादेत विविध गंभीर आजारांवर 1 हजार 209 उपचार पद्धती पैकी रुग्णालयात योजनेच्या नियमानुसार उपलब्ध तज्ज्ञ सुविधांवर पुर्णपणे मोफत उपचारांचा लाभ मिळतो. यासाठी सामाजिक आर्थिक जातीय जनगणना 2011 आधारित विशिष्ठ निकषांनुसार निवडलेल्या ठराविक निवडक लाभार्थी कुटुबांच्या यादीत नाव असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे नाव यादीत आहे किंवा नाही हे शोधण्यासाठी mera.pmjay.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी अथवा 14555या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. अथवा संलग्निकृत रुग्णालयातील योजनेच्या आरोग्यमित्राशी संपर्क साधावा. यादी नाव समाविष्ट असल्याचे निश्चित झाल्यास मूळ शिधापत्रिका व आधार कार्ड अथवा अन्य कोणतेही शासनमान्य मूळ ओळख पत्र हे या योजनेसाठी आवश्यक आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये लाभार्थ्यांना कमाल दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत देण्यात येतात. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. मुळ शिधापत्रिका (केशरी, अन्नपुर्णा, अंत्योदय, पिवळे) 14 दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील पांढरी शिधापत्रिका व 7/12, शासनमान्य मूळ ओळखपत्र जसे-आधार कार्ड, मतदान ओळखपत्र इ. वर्षा खालील बालकांसाठी बालकाच्या जन्माचा दाखला, बालकाचा त्याच्या वडिलांसोबकचा फोटो व वडिलांची इतर कागदपत्रे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 996 उपचार पद्धती व 121 पाठपुरवठा सेवांपैकी रुग्णालयात योजनेच्या नियमानुसार उपलब्ध तज्ज्ञ सुविधांवर पूर्णपणे मोफत उपचारांचा लाभ मिळतो. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्र.155388 किंवा 18002332200 तसेच www.jeevandayee.gov.in या वेबसाईटवर संपर्क करावा असे आवाहन ही यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले.