सावंतवाडीच्या भोसले उद्यानातील ओपन जिममधील साधनांमध्ये दगडांचा अडसर दूर कोण करणार?
सावंतवाडी नगरपालिकेत बबन साळगावकर नगराध्यक्ष असताना माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून ओपन जिम सुरू करण्याचे ठरले आणि सावंतवाडीतील जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानात शहरवासीयांच्या व्यायामाच्या सुविधेसाठी ओपन जिम सुरू करण्यात आले, काही वार्डमध्ये प्रस्तावित आहेत. दररोज पहाटेपासून शहरात तलावावर फेरफटका मारणारे कित्येकजण ओपन जिममध्ये व्यायाम करून ओपन जिमचा फायदा घेत आहेत.
सावंतवाडीतील जन. जगन्नाथराव भोसले उद्यानामध्ये दोन वर्षांपूर्वी ओपन जिम सुरू करण्यात आला आहे. मध्यंतरी उद्यानाच्या संरक्षण भिंतीचे काम झाले आणि खोदाईच्या वेळी मिळालेले भलेमोठे दगड ओपन जिमच्या व्यायामाच्या साधनांच्या पायथ्याशी अस्ताव्यस्त टाकलेले असून व्यायाम करताना महिला, ज्येष्ठ नागरिक यांना अपघात, दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाल्याच्या कामाच्यावेळी काढलेले दगड देखील ओपन जिममध्ये ढीग रचून टाकलेले आहेत, त्याठिकाणी सरपटणारे प्राणी राहिले तर धोकादायक ठरू शकते. शहराची शान असलेल्या जगन्नाथराव भोसले उद्यानातील ओपन जिममध्ये पडलेले दगड उचलून साफसफाई करून लोकांची काळजी घेतली जात नाही आणि शहरात होत असलेल्या ओपन जीमचे श्रेय घेण्यासाठी चढाओढ करताना दिसून येते याचे शहरवासीयांना आश्चर्य वाटत असून, गार्डन मधील ओपन जिमच्या साधनांखाली पडलेले भलेमोठे दगड पाहून लोक टीका करताना दिसून येत आहेत. नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांना जनासुविधा म्हणजे काय याचं ज्ञान नाही का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.