प्रवाशी संघटनेचे एसटी विभाग नियंत्रकांना निवेदन सादर
कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी कर्मचा यांचा गेला महिनाभर बेमुदत संप सुरु आहे. यात ग्रामीण भागातील वयोवृध्द नागरिक, शाळा, कॉलेज विद्यार्थी व नोकरदारांची फार मोठी गैरसोय होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी प्रवाशांची गैरसोय थांबवा,अशी मागणी प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष मनोहर पालयेकर यांनी सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली .
प्रवाशी संघ कणकवलीचे उपाध्यक्ष रमेश जोगळे, माजी गटविकास अधिकारी राजाराम परब, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत भावे, भगवान लोके, एसटी वाहतूक कामगार अधिकारी लवू गोसावी,श्री.साखरे आदी उपस्थित होते.
एसटी बंदमुळे विद्यार्थी, नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.केवळ खाजगी वाहनांवर अवलंबून नागरिकांना नाईलाजास्तव प्रवास करावा लागत आहे. गरीब, होतकरु, विद्यार्थी,नोकरदार हे एसटीने प्रवास करतात. मात्र एसटी सेवा कर्मचा-यांच्या संपामुळे बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे तातडीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांसाठी एसटी फे-या पर्य़ायी व्यवस्था उभारत सेवा सुरु करण्यात यावी, अन्यथा नाईलाजास्तव प्रवाशांच्या हितासाठी आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा प्रवाशी संघाने दिला आहे.