जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक,कवी श्री दीपक पटेकर यांची बालपणीच्या आठवणी जागृत करणारी काव्यरचना
अजाण त्या वयात
गुजरले ते बालपण
नव्हती काही समज
ना होते शहाणपण
दोन बंधाची पिशवी
हेच आमचे दफ्तर
चार वर्गांना होते
तिथे एकच मास्तर
दफ्तरात होती पाटी
पेन्सिल अन पट्टी
अभ्यासा सोबत ही
छान जमलेली गट्टी
विश्वचषक मळ्यात
पिड्याची बॅट घेऊन
विजय होई साजरा
आईसफ्रोट खाऊन
पोहण्यासाठी असत
थेट नदीतच उड्या
मैत्री होती ती पक्की
ना करे कुणी चाड्या
शिरकाटीचा खेळ रंगे
भल्या मोठ्या झाडावर
शहाळ्याच्या पाण्यास
चढू ताठ उंच माडावर
मिळेल का ते बालपण
प्रश्न मनालाच करतो
लहान सहान मुलांत
आपलं जीवन शोधतो
©[दिपी]✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
सिंधुदुर्ग ८४४६७४३१९६
११/१२/२१