बांदा
अतिवृष्टीमुळे शेर्ले केंद्रशाळेच्या विस्तार इमारतीसह छप्पर कोसळून नुकसान झाल्याची घटना गुरूवारी सकाळी घडली. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मोठा अनर्थ टळला. छप्पर, भिंत व पोषण आहाराचे साहित्य मिळून सुमारे अडिच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
गुरूवारी पहाटेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढला. शाळेच्या पाठीमागील वर्गखोलीची भिंत अचानक कोसळली. त्यामुळे छप्परही जमीनदोस्त झाले. सुदैवाने शाळा बंद असल्याने अनर्थ टळला. या वर्गखोलीत विद्यार्थ्यांचा पोषण आहार बनविला जातो. घडलेल्या घटनेत पोषण आहाराचे साहित्य, गॅस सिलिंडर, भांडी, कपाटे, छप्पर यांचे मिळून अडीच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज मुख्याध्यापक लक्ष्मीकांत कराड यांनी वर्तविला आहे.
घटनास्थळाला सरपंच जगन्नाथ धुरी, केंद्र प्रमुख कदम, शेर्ले ग्रामसेवक बाळकृष्ण सुद, शिक्षण विस्तार अधिकारी वृंदा साळगावकर यांनी भेट देत इमारतीची पाहणी केली. सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.