बांदा जवळील करमळे(नाव बदल) जत्रेत आज रात्री ११.०० नंतर एका घरात बसणार जुगाराची बैठक…
बांदा पोलीस दूरक्षेत्राच्या अखत्यारीत येणाऱ्या गावांमधील जत्रोत्सवात सजणाऱ्या जुगाराच्या मैफिली हा गंभीर विषय बनत चालला आहे. दररोज जत्रोत्सवात जुगारासाठी पालं टाकली जातात आणि संवाद मिडियाची बातमी आली की, रात्री वरिष्ठांचे आदेश आल्यानंतर जुगाराच्या बैठकांवर धाड टाकली जाते आणि जुगार खेळणाऱ्या आणि जुगार पाहणाऱ्यांची पळापळ होते. आज बांदा शहराच्या जवळील करमळे(नावात बदल) गावात जत्रोत्सव होत असून, जत्रोत्सवात फुलजार नावाच्या जुगाऱ्याने जुगाराची बैठक बोलाविली असून घंटी आणि वयवंत हे दोघे त्याचे पार्टनर आहेत. रात्री ११.०० वाजल्यानंतर बैठक सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर घरात ही जुगाराची मैफिल रंगणार आहे.
जत्रेत सुरू झालेल्या जुगारांची इत्यंभूत खबर संवाद मिडीयाला त्यांच्या प्रतिनिधींकडून प्राप्त होताच तात्काळ बातमी प्रसिद्ध केली जाते. संवादची बातमी आल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून संबंधित पोलीस निरीक्षकांना आदेश येतात आणि जत्रेत सुरू असलेल्या जुगारांवर धाड टाकली जाते. या धाडीत जुगार खेळणाऱ्यांची पळापळ होते आणि पळापळीत जुगार खेळणारे निसटतात परंतु बेसावध आणि निर्दोष असणारे परंतु जुगार पहायला गेलेले मात्र आपण जुगारी नसताना देखील धावताना जखमी होतात किंवा पोलिसांच्या हाती लागतात. असाच प्रकार कुडाळ तालुक्यातील घावनळे जत्रोत्सवात एलसीबी च्या धाडीनंतर घडला, ज्यात काहीजण जखमी झाले.
जत्रोत्सवात होणाऱ्या जुगाराच्या बैठकीमुळे देवाचा उत्सव साजरा करण्यासाठी आलेल्या लोकांना विनाकारण त्रास होतो आणि गावांची देखील बदनामी होते. पोलीस खात्याने कठोरपणे जत्रोत्सवात होणाऱ्या जुगाराच्या बैठकांवर कारवाई करणे आवश्यक असून गाव पातळीवर देखील गावकऱ्यांनी जागरूक राहणे आवश्यक आहे.
करमळे जत्रोत्सवात आज नक्की काय घडते हे पाहणे औत्सुक्याचे आहे.