जत्रोत्सवात जुगारासारखे खेळ बंदी असावी….सुजाण ग्रामस्थांचे मत
आरोस, ता.सावंतवाडी येथील श्री देवी माऊली जत्रोत्सव ११ डिसेंबर व श्री देव गिरोबा जत्रोत्सव १२ डिसेंबर रोजी होत आहेत.. आरोस गावातील जत्रोत्सव म्हणजे पंचक्रोशीतील लोकांसाठी सोहळाच. श्री गिरोबा जत्रोत्सवाला मुंबईतील चाकरमान्यांसह गोवा आदी ठिकाणी नोकरी व्यवसायानिमित्त असणारे गावकरी इत्यादी आवर्जून उपस्थित असतात. त्यामुळे गिरोबा जत्रोत्सवात भक्तांची मंदियाळी असते. पालखी सोहळा, रात्री रंगणारे दशावतारी नाटक हे जत्रोत्सवातील विशेष आकर्षण असते. जत्रोत्सव म्हणजे गावकऱ्यांसहित माहेरवासीणींसाठी देवाला केळी, देवीची ओटी भरण्याचा एक अमूल्य योगायोग. आणि हाच योग्य साधण्यासाठी माऊली गिरोबा जत्रोत्सवात गर्दी पहावयास मिळते.
अनेक ठिकाणी जत्रोत्सवात रात्री उशिरा खाकी वर्दीशी संधान बांधून जुगार, तीन पत्ती, अंदरबाहर सारखे अवैध धंदे सुरू होतात. काही परप्रांतीय लहान मुलांसाठी मिकी माउस सारखे खेळ आणून त्यांच्या आडून रात्री उशिरा छोटे मोठे जुगाराचे खेळ सुरू करतात. परंतु आजकाल सुशिक्षित समाज अशा अवैध धंद्यांकडे झुकत नाही, आरोस गावातील सज्ञान युवकांनी देखील अशा अवैद्य धंद्यांना जत्रोत्सवात थारा न देण्याचा निर्धार बोलून दाखविला आहे. जत्रोत्सव म्हणजे गावातील देवी देवतांचा उत्सव असतो, अशा उत्सवात देवकार्यात कोणताही चुकीचा पायंडा न पडू देण्याची प्रत्येक गावकऱ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे इतर गावांतील जत्रोत्सवात देखील गावकऱ्यांनी जत्रोत्सव हा देवदेवतांचा उत्सव म्हणूनच साजरा करावा आणि अवैध धंद्यांना थारा देऊ नये. जेणेकरून गावाची बदनामी होणार नाही आणि गावातील युवा वर्ग अनैतिक, अवैद्य मार्गाकडे जाण्यावाचून वाचू शकेल.