जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी मुबारक उमरानी यांची अप्रतिम काव्यरचना
झाडाखाली बसे अप्पा
एकटाच गुणगुणे
हिरव्या भरल्या शेतात
सारे वाटे सुने सुने
मातीतल्या रेघोट्यांना
येईनात हो आकार
कष्ट करुनिया येथे
स्वप्न होईना साकार
माणसेच माणसाशी
बोलण्यास टाळतात
माणसाला हो सोडुनी
हल्ली कुत्रे पाळतात
पाटातलं पाणी आता
पळे इकडे तिकडे
पाण्यासाठी एकमेका
होत आहे हो वाकडे
पिकापेक्षा बाभळीची
दाटी रानामध्ये होते
कणसातील दाण्यांनी
भरेनाही एक पोते
गलिगल्ली फिरतात
उनाडाच्या फटफटी
गुटक्याच्या पिचकारी
नाही पैका हनुवटी
कलीयुगी आला फेरा
प्लास्टिकचा दिसे केर
काडीपैलवानी पोरे
पिज्जा बर्गरचा फेर
सहा पदरी रस्ता माझ्या
रानातून पळे पळे
ढाबा हाँटेलही बार
दिसेनात कोठे मळे
पिकावरी फवारणी
विष जहराची होते
खत युरिया सल्फेट
पिक खाई किड पोते
अप्पा धरी डोके हाती
जागोजागी दिसे खोके
उफराटे झाले सारे
भजीपाव खाई बोके
©मुबारक उमराणी
सांगली
९७६६०८१०९७.