गणेशोत्सव… म्हणजे कोंकणवासीयांचा सर्वात आवडता, आनंदाचा आणि उत्साहाचा सोहळा. घराघरात, चौकात, विविध आस्थापनांमध्ये उत्साहाने होणारे गणेशाचे पूजन, आरती, भजने, जेवणावळी, मंत्रोच्चार आणि भक्तिमय वातावरण यामुळे आनंद जणूकाय ओसंडून वाहत असतो. दीड दिवसांपासून एकवीस दिवसांपर्यंत होणारे गणेशाचे पूजन, आराधना म्हणजे कोकणवासीयांसाठी पर्वणीच. गणेश विसर्जनाच्या दिवशीच “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशी बाप्पाला विनवणी करूनच पुढच्या वर्षीच्या आगमनाकडे डोळे लावून असतात असा हा अवर्णनीय सण.
गणेशाच्या आगमनासाठी त्याचं आसन सजवलं जातं, चौरंगावर त्याला आसनस्थ करतात. मंडपीला त्याकाळात फुलणारी रानफुले, फळे आंब्याचे टाळ, तिरडा, हरन, कवंडाळ, आईन फळ, शेरवाड, सुपारी, नारळ, काकडी, भेंडे अशी एक ना अनेक ज्या त्या भागात भेटणारी फुले, फळे बांधली जातात. त्यासाठी लागणारा दोर सुद्धा किवणीच्या झाडाच्या सालीचाच असतो हे विशेष. गणेशाची आरास सुद्धा पाहण्यासारखी असते. विवीध देखावे, चलचित्रे इत्यादींच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले जाते, पौराणिक कथांचे दर्शन सुद्धा होते. गणेशाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना नैवेद्य म्हणून करंजी, लाडू, मोदक दिले जातात. त्यामुळे गणेशोत्सव हा कोकणातील लोकांसाठी एक आगळावेगळाच उत्सव असतो.
टाळ, मृदुन्ग, हार्मोनियमच्या तालासुरात कानांना तृप्त करणारी श्रीगणेशाची भजने, अभंग, आरती गावागावातील, शहरातील वातावरणच बदलून टाकतात. गणेश दर्शनाच्या, होवसा, भजन, आरतीच्या निमित्ताने लोक एकमेकांच्या घरी जातात, लाडू, करंज्या खातात, त्यामुळे घराघरात एकोपा नांदतो. एकरूप होऊन मोठ्या उत्साहाने, आनंदाने सर्व बाप्पांची सेवा करतात. मुंबई, पुण्यासारख्या मोठमोठ्या शहरातून लाखो चाकरमानी लोक गणेशाच्या आगमनासाठी न चुकता आपल्या गावी येतात आणि तेवढ्याच उत्साहात गणेशाची सेवा करतात, आणि गणेश विसर्जनानंतर आपापल्या कामधंद्यासाठी पुन्हा गावाचा निरोप घेतात.
देशावर आलेले कोरोनाचे संकट, महाराष्ट्रात वाढलेला कोरोनाचा कहर आणि जिल्ह्या बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या स्थानिक, कुटुंबीय, मित्रपरिवारामुळे सिंधुदुर्गात दिवसेंदिवस वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण. यामुळे कोकणातील गणेशोत्सवावरही कोरोनाची गडद छाया पडली आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी होणारी गर्दी, विक्रेत्यांनी गजबजलेल्या बाजारपेठा, आणि या गर्दीत गर्दी होऊन जाणारे बाहेरील जिल्ह्यातून, राज्यातून आलेले आपलेच लोक यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती कित्येक पटींनी वाढली आहे. गेल्या काही महिन्यात जिल्ह्यात दोन लाखांपेक्षा जास्त चाकरमानी आलेले आहेत. गेले काही दिवस जिल्ह्यात क्वचितच रुग्ण दिवसाला भेटत होते, ते प्रमाण एक दोन आठवड्यांपासून दिवसाला ३०/४० रुग्ण संख्येपर्यंत पोचले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या सहाशे पार झाली.
सिंधुदुर्गात आलेल्या काही लोकांनी स्वतःची नीट काळजी न घेता, कोरोन्टाईन असताना सुद्धा कुटुंबियांमध्ये मिसळल्याने काही ठिकाणी संकटात भर पडली आहे. स्थानिक पातळीवर वाढत असलेले रुग्ण ही सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी भविष्यात धोक्याची घंटा आहे. उत्सवासाठी येणारे येतील आणि पुन्हा जातील, परंतु सावधगिरी न बाळगळ्यास जिल्ह्यावासीयांसाठी येणारा काळ मात्र कसोटीचा असेल यात शंकाच नाही.
प्रशासनाने गणेशोत्सव साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन केले आहे, तसेच गर्दी टाळून, मास्क, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन करण्याबाबत जनजागृती केली आहे. गावागावात सरपंचांनी व कोरोना समितीने सुद्दा काही नियम लावले आहेत. वरवर पाहता नियम अन्यायकारक वाटत असले तरी जिल्ह्याच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करता व जिल्ह्यात वाढते रुग्ण पाहता निश्चितच ते योग्य वाटते.
कोकणात मोठ्या उत्साहात साजरा होणारा गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे, परंतु गणेश भक्तांमध्ये दरवर्षी असणारा उत्साह, घराघरात, गावात, शहरात असणारे उत्सवपूर्व वातावरण मात्र कोरोनाच्या सावटात कुठेतरी हरवल्याचे चित्र दिसत आहे. एकंदरीत न दिसणाऱ्या परंतु १४ दिवस का होईना आपल्या प्रियजनांपासून दूर लोटणाऱ्या कोविड-१९ ची भीती कित्येकांच्या मनात घर करून राहिली आहे.
विघ्नहर्त्या गणेशाच्या आगमनासाठी उत्सुक असणाऱ्या कोकणवासीयांवर कोविड-१९ चे विघ्न मात्र मागे लागले आहे. विघ्नहर्त्या गणेशाच्या आगमनानंतर कोरोनाचे विघ्न दूर व्हावे अशीच मनोकामना प्रत्येक कोकणवासीयांची असेल हे मात्र नक्की…!!