You are currently viewing अल्पसंख्यांक बहुल क्षेत्राच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

अल्पसंख्यांक बहुल क्षेत्राच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

– हुजूर इनामदार

सावंतवाडी

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष हुजूर इनामदार यांनी जिल्ह्यातील कुडाळ ,सावंतवाडी, बांदा, बांबर्डे या भागातील अल्पसंख्यांक बहुल क्षेत्राची पाहणी करून तेथील जनतेशी संवाद साधला. तेथील वाडी वसत्यांची दयनीय अवस्था रस्ते, पाणी, विज, दर्गाह, शाळा, कबरस्तान, ईदगाह इत्यादी बाबत यांनी माहिती घेतली. त्यात सुधारणा करण्यासाठी आणि क्षेत्र विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.पिंगुळी येथील बालोद्यान सभागृहामध्ये आयोजित अल्पसंख्यांकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
बाबा खतीब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्यांक विभागाने आयोजित मेळाव्यास जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष नझीर शेख यांनी करताना जिल्ह्यातील अल्पसंख्यांकांच्या अडचणींचा आढावा सादर केला.

जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या केवळ आठ टक्के अल्पसंख्यांकांची लोकसंख्या असून त्यात मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध आणि जैन यांचा समावेश आहे. जिल्ह्यात 25 उर्दू शाळा असून शिक्षकांची 81 पदे मंजूर आहेत. केवळ 56 पदे भरलेली आहेत. 25 पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. जिल्ह्यात अल्पसंख्यांक कार्यालय, मौलाना आजाद कार्यालय नसल्याने येथील जनतेला विकास योजनांची माहिती मिळत नाही त्याचा लाभ घेता येत नाही.

वक्फ बोर्डाचे कार्यालय औरंगाबाद येथे असल्याने धार्मिक स्थळांची नोंदणीसाठी जिल्ह्यातील जनतेला वारंवार औरंगाबाद येथे जाणे शक्य नसल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी वक्फ बोर्डाचे कार्यालय होणे आवश्यक आहे.  गेल्या चार वर्षात अल्पसंख्यांक कल्याण समिती वर अशासकीय सदस्यांची निवड झाली नसल्याने अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रातील विकास कामे झालेली नाहीत व अल्पसंख्यांकाच्या निधीचा वापर कुठे झाला आहे ते कळत नाही. मुस्लिम जातीचे दाखले, विशेष मागास प्रवर्ग आरक्षण, आर्थिक मागास प्रवर्ग आरक्षण याकडेही नझीर शेख यांनी लक्ष वेधले.

या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते व ओबीसी सेलचे अध्यक्ष बाळ कनयाळकर, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव घोगळे, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष उत्तम सराफदार ,सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा उपाध्यक्ष शफीक खान जिल्ह्यातील प्रसिद्ध कारखानदार मुश्ताक शेख आणि इब्राहिम शाहा उपस्थित होते
आभार प्रदर्शनाच्या वेळी जिल्हाध्यक्ष बाबा खतीब यांनी याहीपेक्षा मोठा भरगच्च मेळावा घेऊन सर्व अल्पसंख्यांकांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा