जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री.अरविंदजी ढवळीकर यांची अप्रतिम काव्यरचना
एकदाच मी तुला पाहिले
भाव समाधी सुटली ना!
वसंत ऋतु ही मनी अवतरे
प्रीत पालवी फुटली ना!
लोक सांगती ध्यान मार्ग तो
योग्य तरी ही अवघड हा
परि डोळे मिटता ध्यान तुझे ग
मजला वाटे सोपा हा
कुणी म्हणाले विसर सर्व तू
सत्य मार्ग हा योग पहा
श्वास ही तू निश्वास ही तू
फसला हा ही प्रयोग पहा
संत सांगती नामस्मरणी
जगताचा ही विसर पडे
माळ घेतली म्हणून हाती
नांव तुझे ओठांत अडे
सुहृद बोलले यात्रा करुया
तीर्थांचा महिमाच तसा
सवे मंदिरी गेलो प्रभुच्या
मूर्त तुझी आभास कसा?
मनास केले गुरू शेवटी
त्याविण कोणी शिकले का?
लग्नाची घातली मागणी
माझे कांही चुकले कां?
अरविंद