You are currently viewing 100 टक्के अनुदानाची ‘आदिवासींचे सबळीकरण व स्वाभिमान’ योजना

100 टक्के अनुदानाची ‘आदिवासींचे सबळीकरण व स्वाभिमान’ योजना

सिंधुदुर्गनगरी

 आदिवासींचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील भूमिहिन आदिवासी कुटुंबांना 4 एकर जिरायती ( कोरडवाहू ) किंवा 2 एकर बागायती (ओलिताखालील ) जमीन देण्याबाबत प्रस्तावित आहे. ही योजना 100 टक्के अनुदानित असल्याची माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी, शशिकला अहिरराव यांनी दिली आहे.

            या योजनेंतर्गत निवड करावयाच्या लाभार्थ्यांचे प्राधान्य देण्यात येणारे घटक पुढीलप्रमाणे आहेत. दारिद्र्यरेषेखालील भूमिहिन आदिवासी परितक्त्या स्त्री, दारिद्र्यरेषेखालील भूमिहिन आदिवासी विधवा स्त्री, भूमिहिन कुमारी माता, भूमिहिन आदिम जमाती, भूमिहिन पारधी. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे – लाभार्थ्याचे जात प्रमाणपत्र, लाभार्थ्याचे दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र ( ग्रामसेवकाचे), लाभार्थ्याचे वय किमान 18 व कमाल 60 इतके असावे, लाभार्थी त्या गावचा रहिवासी असावा ( ग्रामसेवक व सरपंच एकत्रित दाखला) दारिद्र्यरेषेखालील यादीत त्याच्या नावाची नोंद असावी, शाळा सोडल्याचा दाखला, वयाचा दाखला, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला.

            पात्र लाभार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण, जि. रायगड या कार्यालयातून कोरे अर्ज घेऊन जावेत व परिपूर्ण भरलेले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दि. 30 डिसेंबर 2021 पर्यंत सादर करावेत. भूमिहिन दारिद्र्यरेषेखालील आदिवसींचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत जमीन विक्रीसाठी इच्छुक  जमीन मालकाने 7/12 व 8 अ इ. कागदपत्रे जोडून परिपुर्ण प्रस्ताव दि. 30 डिसेंबर 2021 पर्यंत सादर करावेत. अधिक माहितीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेणे, जि. रायगड दूरध्वनी क्र. 02143 – 252519 येथे संपर्क करावा असे आवाहन शशिकला अहिरराव, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेणे, जि. रायगड यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा