You are currently viewing अपंग दिवस …

अपंग दिवस …

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कारित ज्येष्ठ लेखिका, कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांचा अप्रतिम लेख

दुनिया मे कितना गम है …
मेरा गम कितना कम है ….

असं आपल्याला कधीच वाटत नाही . माझेच दु:ख्ख फार
मोठे आहे .. किंबहुना माझ्याच वाट्याला जास्त दु:ख्ख
आले आहे … नाही .. देवाने माझ्यावरच जास्त अन्याय
केला आहे… माझ्याच वाट्याला दु:ख्ख का …?

असा नाना प्रकारे संताप करत आपण देवाला दुषणे देत
असतो. देवाने इतक्या अमाप देणग्या आपल्याला दिल्या
आहेत की .. तरी ही त्यांची मुळीच आठवण आपल्याला येत
नाही.. व आपण त्या विषयी कधी ही कृतज्ञता व्यक्त करत
नाही.. इतके आपण स्वार्थी असतो .

 

फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे .. परिस्थिती माणसाला कशी
घडवते हे मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या आजुबाजूला
असंख्य अपंग माणसे आपण बघत असतो. त्यांची आपल्याला
इतकी सवय झालेली असते की , त्यांच्या यातना आपल्या
मेंदूपर्यंत पोहोचतच नाहीत व सरळ दुर्लक्ष करून आपण चालू
लागतो . थोडा वेळ त्यांच्या जागी आपण स्वत:ला ठेवून पहा
मग कसा सर्रक्कन काटा येतो अंगावर …
अपंग आणि गरीब यांची परिस्थिती अत्यंत दयनीय असते.
असेच एक गरीब कुटूंब मी , मुंबईला माझा मुलगा शिकत
असतांना गेले असता, दादर स्टेशनवर मी जे दृश्य पाहिले ते
आज ही माझ्या नजरे समोर तसेच्या तसे दिसते आहे.
गरीबांना मुलांचे वरदान असते. आपल्याकडील अज्ञाना मुळे
त्यांची गरीबी दिवसेंदिवस वाढतच जाते .

मी दृष्य पाहिले ते असे.. मी पुलाच्या वरच्या भागात उभी
होते व खाली पायऱ्यांच्या टोकाशी अवघी दीड ते दोन
वर्षांची मुले एका मोठ्या पिशवीच्या नाड्या, दोन्ही कडून
दोघे जण .. जे नुकतेच चालायला शिकले होते ते.. जड पिशवीच्या नाड्या पकडून चालायचा व आईला मदत करायचा
प्रयत्न करत होते. आईच्या कडेवर तान्हे बाळ व जवळ मोठी
मुलगी , दोघींजवळ ही सामान होते.मी चकित होऊन पहात
उभीच राहिले. दिड दोन वर्षाच्या बाळाच्या पायाला आपण
मातीही लागू देत नाही.. सतत कडेवर घेऊन त्यांचे मुके घेतो,
नाना प्रकारे त्यांना आपण जपतो. आणि ही मुले अंगावर धड
कपडे नसतांना आईचे ओझे नाईलाजाने का होईना, त्यांना झेपत नसतांनाही चालण्याचा प्रयत्न करत होते .

ही गोष्ट चांगली की वाईट ? अर्थात , वाईटंच ….! जीवन किती लवकर त्यांना
कळत होते? परिस्थितीशी कसे झुंजायचे याचे धडे किती
लहान वयात त्यांना मिळत होते ? जे वाट्याला येऊ नये ते
किती लवकर त्यांच्या वाट्याला आले होते …! मन हळहळत
होते व त्यांच्या निरागस चेहऱ्यांकडे पाहून कौतुकही वाटत
होते.. कारण त्यांना माहितच नव्हते की ते त्रासात आहेत.
किंबहुना हे असेच असते असे त्यांच्या बालमनाला वाटत
असावे. खरे तर ते ही कळण्याचे त्यांचे वय नव्हते ..जरा
आपली मुले आठवा ना ?

 

ही गोष्ट मी तुम्हाला अशा साठी सांगितली की माणूस
जिथे जसा जन्मतो तिथे तशा परिस्थितीशी जुळवून घेतो…
रडत बसत नाही … रडायची सवय आपल्याला असते
त्यांना नाही .. ते कधी ही तक्रार करत नाहीत तर …
परिस्थितीवर …मात … करतात . आपला मार्ग आपण
शोधतात .

 

आजच एक अपंग मुलांचा व्हिडिओ मी पाहिला .. खूप
रडवले त्याने मला .. पण ती मुले …?
मस्त मजेत होती …कुणाला पाय नव्हते, कुणाला हात नव्हते,
कुणाला हाताची बोटे नव्हती , कुणाचे पाय वाकडे होते, कुणी
जमिनीवर सरकत चालत होते पण …
कुणाच्याही चेहऱ्यावर दु:ख्खाचा लवलेशही नव्हता. मस्त
मजेत होती ती.. ज्यांना वाकड्या पायांनी का होईना डगमगत
चालता येत होते ते ज्यांना मुळीच चालता येत नाही त्यांची
व्हिलचेअर मजेत ढकलत त्यांना इकडून तिकडे नेत होते .
ज्यांना बोटं नव्हती ते ही जमवून घेत चमच्याने जेवत होते.
ज्यांना शक्यच नाही त्यांना आया भरवत होती.

 

व्हिडिओ पाहून मी थक्क झाले . वाईट तर खूप वाटले पण
आनंद झाला तो ते आनंदात आहेत हे पाहून ..! त्यांनी ती
परिस्थिती इतकी स्वीकारली होती की दु:ख्खाचा लवलेशही
त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. कदाचित लहान वयामुळे परिस्थितीचे गांभीर्य त्यांना कळत नसेलही पण समज
येई पर्यंत ते नक्कीच स्वीकारतील की यातूनच आपल्याला
मार्ग काढायचा आहे .. दुसरा पर्याय नाहीच तर मग …
कशाला रडत बसायचे …? ही झाली जमेची बाजू ..
पण अशा मुलांसाठी ज्या संस्था काम करतात व ज्या
मानवतेने त्यांना सांभाळतात ती माणसे देवाहूनही थोर आहेत
कारण ते देवाने अपुर्ण ठेवलेलं काम ते पूर्ण करतात. त्या
अर्थाने त्यांच्या महानतेला तोडच नाही. दृष्टी नसणे, हात पाय
नसणे या गोष्टींच्या कल्पनेनेच आपल्या पायाखालील जमीन
सरकते मग ज्यांना ह्या परिस्थितीला सामोरे जावे लागते त्यांना
दैनंदिन जीवनात किती अडचणी येत असतील या कल्पनेने ही
आपला थरकाप होतो.

पूर्वी कोशिश नावाचा सिनेमाही या वर निघाला होता. तसेच
अंध मुलीवर ब्लॅक नावाचा सिनेमा निघाला होता. अनेक सेवा
भावी संस्था व स्पेशल शाळा अशा मुलांसाठी उत्कृष्ठ काम
करतात व खाणाखुणांनी , ज्यांना बोलता ऐकता येत नाही ती
मुले आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करतात ही फार मोठी
जमेची बाजू आहे. हो, रोजचेच अपरिहार्य जीवन दु:ख्खात का
जगायचे ..? कारणच नाही … आहे त्या परिस्थितीत आनंदानेच जगले पाहजे , मला वाटते.. हाच जीवनाचा नियम
असावा. असायला हवा.कदाचित आपल्याला हे त्यांच्याकडूनच शिकावे लागेल.. अशीच परस्थिती आहे ..
इतके तक्रारखोर आहोत आपण….!

 

आता प्रश्न आहे तो.. आपले अशा लोकांप्रती असलेले
उत्तरदायित्व …करतात इतर संस्था …आहेत ना.. ?
आपलं काय काम आहे …?स्वत:ला व आपल्या मुलांना
त्या जागी ठेवा म्हणजे काळीज हलेल.. इतके उदासिन
राहून नाही चालणार आपल्याला …! ज्यांचा काही ही
दोष नाही ,तरी त्यांच्या नशिबी हे आले… कारण कुठे
कसा जन्म घ्यावा हे मुळीच आपल्या हाती नाही . मग उद्या
हीच परिस्थिती आपल्यावरही येऊ शकते .. याचे भान ठेवून
अशा लोकांसाठी आपल्याला जमेल ती .. शारिरीक,आर्थिक
मानसिक मदत आपण केली पाहिजे , नव्हे ते आपले प्रथम
कर्तव्यच आहे, बांधिलकी आहे.. हे लक्षात घेऊन आपण
लगेच कामाला लागू या … हो…

“Better let than Never “………..

“शुभस्य शिघ्रंम् …..”

हो .. ही सर्वस्वी माझीच मते आहेत ….
पण… तरी ही तुम्ही सहमत व्हालच याची खात्री आहे मला …. हो ना ….?

ंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि:३० नोव्हेंबर २०२१
वेळ: २: १२ दुपारी

प्रतिक्रिया व्यक्त करा