You are currently viewing सिंधुदुर्गात स्वबळावर निवडणूक

सिंधुदुर्गात स्वबळावर निवडणूक

निर्णयावर काँग्रेस श्रेष्टींचे शिक्कामोर्तब

राज्य निवड मंडळाची बैठक संपन्न

मुंबई

” सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, दोडामार्ग, वैभववाडी व देवगड या नगरपंचायतीच्या निवडणुका स्वबळावर लढविण्यात येणार असुन काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

काँग्रेस पक्षाच्या राज्य निवड मंडळाची बैठक काल (गुरुवारी) प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन, मुंबई येथे संपन्न झाली. त्यावेळी एकमताने हा निर्णय घेण्यात आला. यावेळी अ.भा.काँग्रेसचे सचिव व सहप्रभारी श्री. संपतकुमार, माजी मंत्री व कार्याध्यक्ष मा.नसीम खान, माजी प्रदेशाध्यक्ष मा.माणिकराव ठाकरे, उपाध्यक्ष माजी खा.हुसेन दलवाई व श्री.भाई नगराळे , प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रदेश सरचिटणीस श्री.प्रमोद मोरे, किसान काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री.शाम पाण्डेय, प्रदेश सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग प्रभारी श्री.विनायकराव देशमुख, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री.बाळा गावडे, सहप्रभारी श्री.शशांक बावचकर,निरीक्षक श्री.इब्राहिम दलवाई, ज्येष्ठ नेते दादा परब, समीर वंजारी आदी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष मा.आ.नानाभाऊ पटोले यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणूक नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले. ही निवडणुक पुर्ण ताकदीने लढविण्यात येणार असुन प्रदेश काँग्रेस कडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.

प्रारंभी प्रभारी श्री.विनायकराव देशमुख यांनी सांगितले, ” दि.१० नोव्हेंबर रोजी प्रभारीपदी नियुक्ती झाल्यावर मागील २० दिवसात आपण तीन वेळा सिंधुदुर्गचे दौरे केले. आठ पैकी सहा तालुक्यांना भेटी देऊन कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. काँन्ग्रेस पक्षाला जिल्ह्यात पोषक वातावरण असुन स्वबळावर निवडणूक लढविल्यास पक्षाला चांगले यश मिळेल.”

जिल्हाध्यक्ष श्री.बाळा गावडे यांनी चार नगरपंचायत क्षेत्रातील सर्व म्हणजे ६८ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज पक्षाकडे सादर केले. जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता या निवडणुकीत आश्चर्यकारक निकाल येतील, अशी ग्वाही दिली.”

निरीक्षक श्री.इब्राहिम दलवाई यांनी जिल्ह्याचा निरीक्षण अहवाल निवड मंडळासमोर सादर केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते श्री.दादा परब (वय वर्षे८१) पोटतिडकीने भावना व्यक्त करताना म्हणाले, सिंधुदुर्ग हा काँग्रेस विचारांचा जिल्हा आहे. यापूर्वी घडलेल्या काही राजकीय स्थित्यंतरामुळे काँग्रेस पक्षावर सध्याची वेळ आली आहे. मात्र प्रभारीपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर श्री. देशमुखांनी ज्या कुशलतेने व तडफेने काम सुरू केले आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. आता राज्यातील नेत्यांनी सहकार्य केल्यास जिल्ह्यात पुन्हा काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येतील.”

प्रतिक्रिया व्यक्त करा