सीईटी परीक्षांना येत्या 3 ऑक्टोबरपासून सुरुवात
पुणे
राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) तंत्रशिक्षण आणि उच्चशिक्षण विभागाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले. त्यानुसार सीईटी परीक्षांना येत्या 3 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.
राज्य सीईटी सेलने प्रसिद्ध केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार तंत्रशिक्षण विभागाच्या चार सीईटी परीक्षा, तर उच्च शिक्षण विभागाच्या आठ सीईटी परीक्षा येत्या ऑक्टोबर महिन्यात होणार आहेत. त्या सुरक्षित नियमांचे पालन करून घेण्यात येणार आहे.
परीक्षा केंद्राची माहिती, रिपोर्टिंग टाइम, परीक्षा सुरू होण्याची वेळ आदींबाबतची माहिती प्रवेश पत्रावर देण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे परीक्षा केंद्रावरील सुरक्षित नियमांची माहितीदेखील प्रवेश पत्रावर प्रकाशित करण्यात येईल. परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचणाऱ्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार नाही, असेही सीईटी सेलने स्पष्ट केले.
दरम्यान, तीन वर्षीय एलएलबी आणि बीएड या अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा येत्या काही दिवसांत जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. या प्रवेश परीक्षांबाबत अधिक माहिती राज्य सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उच्चशिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा
अभ्यासक्रम : सीईटी परीक्षा दिनांक
एमपीएड – 3 ऑक्टोबर
एमएड – 3 ऑक्टोबर
बीएड/एमएड सीईटी – 10 ऑक्टोबर
एलएलबी ( पाच वर्षे) – 11 ऑक्टोबर
बीपीएड – 11 ऑक्टोबर
बीए/ बीएस्सी बीएड इंटिग्रेटेड – 11 ऑक्टोबर
तंत्रशिक्षण विभागाच्या सीईटी
अभ्यासक्रम – सीईटी परीक्षा दिनांक
एम-आर्च सीईटी – 3 ऑक्टोबर
एम- एचएमसीटी – 3 ऑक्टोबर
एमसीए – 10 ऑक्टोबर
बी-एचएमसीटी – 10 ऑक्टोबर