You are currently viewing उद्योजकता व कौशल्य विकासावर अधारित नवीन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान

उद्योजकता व कौशल्य विकासावर अधारित नवीन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान

सिंधुदुर्गनगरी

केंद्र शासनाने सन 2021- 22 या वर्षापासून पशुसंवर्धनाव्दारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारीत नविन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेस मंजुरी प्रदान केलेली आहे. योजनेअंतर्गत शेळी – मेंढी पालन, कुक्कुट पालन, वराह पालन, पशुखाद्य व  वैरण विकास उपअभियांनांतर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर व फॉडर ब्लॉक निर्मिती तसेच वैरण बियाणे उत्पादन या योजनांकरीता 50 टक्के अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अनुदानाची अधिकता मर्यादा शेळी- मेंढी पालनाकरीता 50 लक्ष रुपये,कुक्कुट पालनाकरीता 25 लक्ष रुपये, वराह पालनाकरीता 30 लक्ष रुपये आणि पशुखाद्य व वैरण विकास यासाठी  50 लक्ष रुपये अशी आहे. प्रकल्पाकरीता स्वहिस्सा व्यक्तिरीक्त उर्वरित आवश्यक निधी बँकेकडून कर्जाव्दारे उपलब्ध करुन घ्यावयाचा आहे.

या योजनेचा लाभ व्यक्तीगत व्यवसायीक, स्वंय सहाय्यता बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी सहकारी संस्था, कलम 8 अंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी, सहकारी दुध उत्पादक संस्था, सह जोखिम गट (जेएलजी), सहकारी संस्था, खाजगी संस्था, स्टार्टअप ग्रुप इत्यादी घेवू शकतात.

            या योजनांच्या लाभाकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावयाचा असून, अर्ज सादर करताना सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर), पॅन कार्ड, आधार कार्ड, रहिवाशी पुरावा (मतदान ओळखपत्र, वीज देयकाची प्रत), छायाचित्र, बॅकेचा रद्द केलेला चेक इत्यादी सादर करणे अनिवार्य असून, अनुभवाचे प्रमाणपत्र, वार्षिक लेखामेळ, आयकर रिटर्न, प्रशिक्षण प्रमाणपत्र, जमिनीचे कागदपत्र, जीएसटी नोंदणी इत्यादी उपलब्ध असल्यास सादर करावे.

            योजनेच्या सर्व मार्गदर्शक सूचना, वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न, अर्जाचा नमूना इत्यादी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळ https://ahd.maharashtra.gov.in व केंद्र शासनाच्या संकेतस्थळ https://www.nlm.udyamimitra.in वर उपलब्ध आहे.

राज्यातील पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाच्या पशुसंवर्धनाव्दारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारीत नविन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेचा जास्ती जास्त इच्छुक व्यक्ती व संस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन सचिन्द्र प्रताप सिंह आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा