You are currently viewing सिंधुदुर्ग गोवा सीमेवरील गोव्यातील जत्रोत्सवात खेळले जातात जुगार

सिंधुदुर्ग गोवा सीमेवरील गोव्यातील जत्रोत्सवात खेळले जातात जुगार

मात्र बिघडतेय सिंधुदुर्ग मधील तरुणाई

सिंधुदुर्ग आणि गोव्याचं नातं पूर्वीपासून बंधुत्वाचं. दोन्ही राज्यांच्या सीमेवरील गावांमध्ये सलोख्याचे संबंध, गावांमधील सांस्कृतिक ठेवण देखील सारखीच. त्यामुळे जत्रोत्सव सारख्या धार्मिक कार्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोक देखील गोव्यातील गावांच्या जत्रोत्सवात सामील होतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली काही वर्षे जत्रोत्सवात जुगारांवर बंदी आलेली आहे, परंतु गोव्यातील गावांमध्ये जत्रोत्सवात मोठ्या प्रमाणावर जुगाराचे खेळ चालतात.
सिंधुदुर्ग सीमे लगतच्या गोव्यातील गावांमध्ये जत्रोत्सवात जुगार खेळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकच जास्त प्रमाणात जातात. यात प्रामुख्याने तरुण वर्गाचा समावेश असतो. त्यामुळे तरुणाईची दिशा भरकटते. काही कष्टकरी लोक घरातील दागदागिने गहाण टाकून, बचत गटांचे पैसे व्याजाने घेऊन जुगारात नशीब आजमावण्यासाठी जातात, आणि हातचे गमावून बसतात. गोव्यात बिनधास्तपणे जुगार खेळता येत असल्याने तरुणाईचा गोव्यातील जत्रोत्सवात वावर वाढला आहे.
गोव्यातील कॅसिनो मध्ये खेळण्यासाठी गोयकारांना परवानगी नाही, परंतु शेजारील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणाई मात्र वाट्टेल ते विकून, उधार उसनवारी करून गोव्यात जाऊन कॅसिनोमध्ये जुगार खेळते. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक तरुणांची अवस्था “मोठ्या घरचे पोकळ वासे” अशीच झाली आहे. अनेकांचे होत्याचे नव्हते होऊनही कधीतरी सुरुवातीला मिळणाऱ्या पैशांच्या आशेपोटी तरुणाई कॅसिनोकडे आकर्षित झाली आणि बरबादीकडे ओढली गेली आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावचेच. परंतु गोवा राज्याच्या सीमेवरच जुगार सुरू असल्याने गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून गोव्यातील सीमे लगतच्या गावांमध्ये जुगारांवर नियंत्रण आणण्याची अपेक्षा सिंधुदुर्ग वासीयांची आहे, जेणेकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणाई बरबादीकडे जाण्यावाचून वाचू शकेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा