जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री चंद्रशेखर धर्माधिकारी यांची काव्यरचना
काळ्या कभिन्न मेघातूनी उपजे विद्दूलता हासरी
आषाढाला निरोप देऊनी बरसती श्रावणसरी
व्रुक्षलतेवरी पानोपानी जलबिंदूंची नक्षी
चिंब भिजूनी गीत खुशीचे गातसे पक्षी
फुलवित पिसारा मोर नाचतो टपटप तालावरी
आषाढाला निरोप देऊनी बरसती श्रावणसरी
शालू हिरवा परिधान करुनी सजली अवघी धरती
धूपछाँव हा पदर विराजे डोंगरमाथ्यावरती
शुभ्रधवल जलधारा शोभे मौक्तिक माळेपरी
आषाढाला निरोप देऊनी बरसती श्रावणसरी
इंद्रधनूच्या सभामंडपी जमले देवादिक
पर्वत शिखरावरी होतसे इंद्राचा अभिषेक
रविकिरणांचे मंगलतोरण जलमय कुंभावरी
आषाढाला निरोप देऊनी बरसती श्रावणसरी
ढगावरी हा स्वार होऊनी वरुणराज अवतरतो
जलसंपत्ती दान स्रुष्टीच्या पदरी ठेऊनी जातो
ऊनपाऊस श्रावणसुख हे जपते धरा अंतरी
आषाढाला निरोप देऊनी बरसती श्रावणसरी
चंद्रशेखर द. धर्माधिकारी
वारजे,पुणे ©️
मोबा.नं.9511635046
छान