You are currently viewing केव्हांतरी पहाटे..

केव्हांतरी पहाटे..

  • Post category:लेख
  • Post comments:3 Comments

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सदस्या लेखिका, कवयित्री राधिका भांडारकर यांनी सुरेश भट यांच्या गझलेचे केलेले रसग्रहण

(सुरेश भट.)

केव्हांतरी पहाटे उलटून रात्र गेली ..ही ह्रदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली आणि आशा भोसले यांनी गायलेली सुरेश भट यांची गझल ,गेली अनेक वर्षे
आपण प्रत्येकवेळी त्याच मग्नतेने ऐकत आलो आहोत.
त्यातले हळुवार मुलायम, कोमल ,नाजूक,,संवेदनशील शब्द
मनावर हलकेच पांघरत नशा चढवते.गझल म्हटली म्हणजे शृंगार,शृंगारातील विरहवेदना नाहीतर मधुर मीलनाच्या आठवणी..कधी रूसवा कधी नाराजी तर कधी
आग्रह…एक नायक एक नायिका..एक प्रियकर ,एक प्रेयसी…आजपर्यंत केव्हांतरी पहाटे ..याच आशयाने ऐकले…पण आज इतक्या वर्षानंतर ही गझल थोडा वेगळा अर्थ घेउन मनात उतरली…वास्तविक कवीचं
मन ,त्या मनातले काव्यरचनेचे अर्थ हे वाचकाला अक्षरश:
कळणं कठीणच..कॅलीडिओस्कोपचा कोन बदलला की आकृती बदलते…तसं काहीसं जाणवलं…
केव्हांतरी पहाटे उलटून रात्र गेली…ही अवस्थेतले टप्पे ,
स्थित्यंतरे नाही ना सुचवत?
रात्र उलटून गेली…एक अवस्थाच संपली.
बाल्यावस्था संपून यौवनावस्थेत पाउल पडतेय् ..आत जाणवणारे बदल ,भावनिक अंदोलने ,हुरहुर ओढ अशा अनोळख्या प्रदेशात ही ऊलटणारी रात्र घेउन जात आहे..!

सांगू तरी कसे मी वय कोवळे ऊन्हाचे..

.या कोवळ्या यौवनावस्थेनं मन बावरलंय्.. या अवस्थेत जणु श्वास ऊसवून या रात्रीने फसवून आणले आहे…बालपणीची
चांदणस्वप्ने जणु आकाशाने उचलून नेली…आणि ही
रात्र संपुन गेली…

कळले मला न केव्हा सुटली मीठी जराशी..

ही मीठी कुठल्या प्रणयातली नव्हे ..तर बाल्यावस्थेतील मीठी सैल झाली अन् रात्र ऊलटून गेली ..नव्या अनोळखी
यौवनावस्थेत सोडून गेली..

शब्दांचा नीट मागोवा घेतला तर जाणवते ही गझल
एका हळुवार स्थित्यंतराची झलक अनुभवायला लावते..
आणि त्या बदलातलं हे भांबावणं आहे…
उलटून गेलेली रात्र हा एक टप्पा सूचीत करतो….
गजरा कसा फुलांचा विसरुन रात्र गेली…..
मात्र या पलटणार्‍या रात्रीने ,हरवलेल्या बालपणीच्या
आठवणीतला सुगंध मात्र मागे ठेवलाय्…
अशी ही केव्हांतरी पहाटे या गझलची उकल…
निसर्गातील अवस्थांतील बदलांचच हळुवारपणे दर्शन घडवणारी…सुंदर..!!!

 

 

ई अभिव्यक्ती गझलसम्राट सुरेश भट यांचा १५एप्रील
हा जन्म दिवस .त्या निमीत्ताने त्यांच्या एका प्रसिद्ध
गझलेचे रसग्रहण.

केव्हांतरी पहाटे उलटून रात्र गेली
मिटले चुकुन डोळे हरवून रात्र गेली

कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हां निसटून रात्र गेली

सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे?
ऊसवून श्वास माझा फसवून रात्र गेली

उरले उरात काही आवाज चांदण्यांचे
आकाश तारकांचे उचलून रात्र गेली

स्मरल्या मला न तेव्हां माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली

आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी
हलकेच कूस माझी बदलून रात्र गेली

अजुनी सुगंध येई दुलईस मोगर्‍याचा
गजरा कसा फुलांचा विसरुन रात्र गेली.

*सुरेश भट*

सौ. राधिका भांडारकर
पुणे

This Post Has 3 Comments

  1. उषा ढगे

    राधिका भांडारकरांनी सुरेश भट यांच्या केव्हातरी पहाटे या गजलेचे केलेले रसग्रहण अतिशय भावले..

  2. सुहास रघुनाथ पंडित सांगली

    कवितेची दुसरी बाजू उलगडून दाखवली आहे.

  3. अरूणा मुल्हेरकर

    केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली ह्या सुरेश भटांच्या गाजलेल्या गझलेतील सौ.राधिका भांडारकर यांनी सांगितलेला बाल्यावस्था संपून यौवनावस्थेला सुरवात झाली आहे हा गहन भावार्थ अगदी पटण्यासारखा.
    यावरून त्यांची वैचारिक पातळी किती उच्च आहे हे दिसून येते,.

प्रतिक्रिया व्यक्त करा