देवगड
आनंदवाडी येथील शिवाजी सुभाष कुबल यांच्या घरातील ८५०० रूपये रक्कम चोरून घराला आग लावण्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी ७ वा.सुमारास घडला.याबाबत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आनंदवाडी येथील शिवाजी कुबल हे शनिवारी सायंकाळी मच्छिमारीसाठी गेले होते तर पत्नी व मुलेही घरी नव्हती दरम्यान सायंकाळी ७ वा.सुमारास त्यांचा घराच्या दरवाजाचा नागोसा वाकवून दरवाजा उघडून आत प्रवेश करून घरातील रोख रक्कम ८५०० रूपये चोरट्यांनी चोरून नेली व घरातील वस्तूंना आग लावल्याने वस्तू जळाल्या.यामध्ये टीव्ही, कपाट, कपडे आदी साहित्य जळून गेले तर कुबल यांनी ठेवलेल्या ठिकाणी दागीनेही मिळून आले नाहीत.याप्रकरणी त्यांची पत्नी शिवानी शिवाजी कुबल यांनी देवगड पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पो.हे.कॉ.राजन जाधव करीत आहेत.