भाजपा दिव्यांग आघाडीचे आयोजन : संयोजक अनिल शिंगाडे यांची माहिती
वेंगुर्ला:
भाजप जिल्हा दिव्यांग आघाडीच्या वतीने वेंगुर्ले येथील साई मंगल कार्यालयात ३ डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून सकाळी ११ वाजता “जिल्हास्तरिय दिव्यांग मेळावा” आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती भाजपा दिंव्यांग आघाडी, सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक अनित शिंगाडे यांनी वेंगुर्ले येथे दिली.
सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल चे अध्यक्ष अनित शिंगाडे यांची भाजपा दिंव्यांग आघाडी, सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी नुकतीच निवड झाली आहे. हि निवड झाल्यानंतर त्यांनी पहील्यांदाच वेंगुर्ले भाजपा कार्यालयाला भेट दिली.
या भेटी दरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या मेळाव्या बाबत माहिती दिली. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या सह दिंव्यांग आघाडी जिल्हा सहसंयोजक शामसुंदर नारायण लोट ( भडगाव – कुडाळ ), वेंगुर्ले तालुका संयोजक भुषण विजय तुळसकर ( तुळस ), सुनील सुभाष जाधव ( अणाव – कुडाळ ), सुनील घाग (खानोली – वेंगुर्ले ) इत्यादी दिव्यांग बांधव उपस्थित होते.
अनिल शिंगाडे यांनी माहिती देताना सांगितले की, दिव्यांग बांधवांसाठी आपण अनेक वर्ष काम करत आहे. संस्थेमध्ये ३७८२ सदस्य नोंदणी आहे. मात्र या दिव्यांग बांधवांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी. त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. तसेच शासकीय योजनांची माहिती त्यांच्या पर्यंत पोहोचावी यासाठी आमचा प्रयत्न आहे. भाजपा दिव्यांग आघाडीच्या माध्यमातून यापुढे आम्ही जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांना एकत्र करून आमच्या मागण्या आम्ही सरकार दरबारामार्फत पूर्ण करून घेऊ. याचाच एक भाग म्हणून वेंगुर्ले येथे आज जिल्हास्तरीय दिव्यांग मेळावा आयोजित केला आहे. तरी या मेळाव्याला मोठ्या संख्येने दिव्यांग बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री. शिंगाडे यांनी यावेळी केले.
या मेळाव्याची रूपरेषा सांगताना जिल्हा सरचिटणीस प्रसंना देसाई म्हणाले की, मेळाव्याला येणाऱ्या प्रत्येक बांधवाला भेट म्हणून ब्लँकेटचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच भाजपचे नेते प्रसाद लाड यांच्यामार्फत ५ दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर चे वाटप, २५ बांधवांना डॉक्टर राजन शिरसाट यांच्या माध्यमातून पांढरी काठी वाटप, तसेच असलदे येथील सानिका तांबे या दिव्यांग भगिनीला भगीरथ प्रतिष्ठान च्या वतीने डॉक्टर प्रसाद देवधर यांच्या माध्यमातून इलेक्ट्रिक शिलाई मशीन से वाटप करण्यात येणार आहे. या मेळाव्याला जिल्ह्यातून १५० ते २०० दिव्यांग बांधव उपस्थित राहणार असल्याचेही श्री देसाई यांनी यावेळी सांगितले.