जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कारित ज्येष्ठ लेखिका, कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांचा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त लिहिलेला अप्रतिम लेख
काही काही लोक हे समाजाठीच जन्माला आलेले असतात.
नव्हे, त्यांचे जीवीत कर्तव्य तेच असते.. मग काळ कोणता ही
नि किती ही कठीण असू दे त्याची त्यांना मुळीच पर्वा नसते.
असे अनेक महात्मे भारतात होऊन गेले, ज्यांची यादी
नि कर्तृत्व फार मोठे आहे. त्यात जसे देशासाठी प्राणार्पण
करणारे भगतसिंग राजगुरूं सारखे महनीय आहेत तसेच निव्वळ समाजासाठी झटणारे थोर समाज सुधारकही आहेत.
त्यात आपल्याला स्वामी विवेकानंदांचे गुरू ज्यांनी नरेंद्रचा
विवेकानंद केला ते रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंदांचेही
नाव अग्रभागी ठेवावे लागेल कारण पहिल्यांदा भारताची खरी
ओळख त्यांनी परकियांना करून दिली. अशा अनेक थोर
विभूतींमध्ये आपल्याला आज महात्मा जोतीराव फुले यांची
आठवण जागवायची आहे .
हो .. आज त्यांची पुण्यतिथी … त्यांच्या पुण्य स्मरणाचा दिवस.जोतीराव व सावित्रीबाई यांचे जीवन चरित्र वाचले
म्हणजे अचंबित व्हायला होते नि वाटते, त्याच मातीतील
आम्ही ही आहोत पण किती फरक हो त्यांच्यात आणि
आमच्यात …? त्यांच्याशी तुलना केली तर … लाज वाटावी
असेच आपले वर्तन आहे असेच म्हणावे लागेल.१८ रा व्या
शतकाच्या मध्याला जवळ फुटकी कवडी नसतांना, शाळेत
शिकवता म्हणून समाजाच्या दडपणाखाली बेघर व्हावे लागले
असतांना एवढी हिंमत कुठून आणली असेल हो? विचार केला
तरी मेंदूचा भुगा होतो.इतकी निडर छाती असावी माणसाची
की त्याला कसलीही लाज वाटू नये… तेच धैर्य जोतीरावां
जवळ असल्यामुळे, इंग्लंडचा राजा भारतात आला असता
खऱ्या भारताचे चित्र राजासमोर उभे करण्यासाठी लक्तरे
पांघरून ते समारंभास गेले … (आणि आपण… आपले देखणे पण मिरवणारे .. काही कर्तृत्व नसतांना)……
माझा भारत असा आहे. शेतकऱ्यांची स्थिती अशी आहे , जसे
मी कपडे घातले आहेत तशी (…बाकीचे सारे मात्र फेटे पगड्या
मिरवत सामोरे गेले.. )याला म्हणतात देशा विषयीचा कळवळा!
“शेतकऱ्यांचाआसूड” गुलामगिरी” ही पुस्तके वाचली म्हणजे
संताप म्हणजे काय असतो ते आपल्याला कळते.मुला मुलींसाठी शाळा काढतांनाच उपेक्षित महिलांसाठी आश्रय
स्थान व त्या काळात पाळणाघर काढणे म्हणजे वाघाचेच
काळीज हवे यात मुळीच शंका नाही.हत्ती जसा आपली चाल
चालत राहतो तसे जोतीराव चालत राहिले न डगमगता ..!
व त्यांना साथ मिळाली ती वाघिणीचे काळीज असलेल्या
सावित्रीबाईंची…
अहो, न्यायमुर्ती माधव गोविंद रानडे यांनी वडिलांच्या व
समाजाच्या दबावाला बळी पडून नाईलाजाने ११ वर्षांच्या
(रानडे तेव्हा३२ चे होते) रमाबाईंशी विवाह केला व पहिल्याच
दिवशी बायकोच्या हाती लेखणी देऊन शिक्षणाचा श्रीगणेशा
केला असता घरातील स्रियांनी त्यांना नाना प्रकारे छळले व
जीव नकोसा केला असा तो काळ ….! विचार करा जिथे
न्यायमुर्तींसारख्या महान व्यक्तीला हे सोसावे लागले अशा
भयंकर जुनाट रूढीग्रस्त काळात जोतीरावांना व सावित्रीबाईंना
कशा कशाला तोंड द्यावे लागले असेल .. !
सामाजाने मारेकरी सुद्धा घातले त्यांच्यावर .. पण तिथे ही
जोतीराव उजवे ठरले . मारेकऱ्यांनाच विचारले…
बाबांनो .. मी तर तुम्हाला ओळखत देखील नाही .. मग मी
तुमचा असा काय गुन्हा केला की तुम्ही मला ठार करायला
निघालात …? तुम्हाला खूप पैसे मिळणार आहेत का ?
ठीक आहे .. मी मेल्याने तुमचा फायदा होत असेल तर
खुशाल मला मारा .. मारेकऱ्यांनी ही त्यांच्या आयुष्यात असा
माणूस पाहिला नव्हता … दुसऱ्याच्या फायद्यासाठी प्राणार्पण
करणारा .. खाडकन् त्यांचे डोळे उघडले नि ते दोघे शिकून
पंडित व जोतिरावांचे अंगरक्षक बनले. असे अद्भूत चरित्र
क्वचितच कुणाचे असेल जे जोतीराव व सावित्रीचे आहे…
अशा महनीय व्यक्तींनी आपला भारत सुजलाम सुफलाम
आहे म्हणून बरे … नाही तर … आज ही आम्ही कदाचित
पगड्या नि फेटे बांधूनच वावरलो असतो …
केवढे उपकार आहेत या शिक्षण महर्षींचे आपल्यावर …
एवढी महान परंपरा आम्हाला असतांना आम्ही मात्र एवढे
करंटे का आहोत की स्वत:च्या स्वार्थापलीकडे आम्हाला काही ही दिसू नये ..निदान आजच्या दिवशी तरी आपण आपले वर्तन
तपासून पाहिले पाहिजे व स्वत:ला एक प्रश्न अवश्य विचारला पाहिजे की, ज्या देशात अत्यंत सुखासमाधानात
आम्ही राहतो (एक लक्षात ठेवा भारता इतका चांगला देश
जगात दुसरा नाही)त्या मातृभूमीचे आम्ही काही देणे लागतो
की नाही ? एवढ्या त्यागातून ज्यांनी हा देश आम्हाला समर्पित
केला त्यांच्या प्रति आमचे काहीच उत्तरदायित्व नाही काय ?
आज एवढे केले तरी पुरे … योग्य उत्तर शोधून योग्य कृतीकडे
जाण्याची बुद्धी देव आम्हाला देवो .. असा आशावाद व्यक्त
करून थांबते … “चूक भूल माफ असावी”…..
हो .. ही फक्त माझी आणि माझीच मते आहेत …
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि :२७ नोव्हेंबर २०२१
वेळ : रात्री ८:४३