लाभार्थ्यांचे तहसील प्रशासनाला निवेदन; तात्काळ मदत देण्याची मागणी…
सावंतवाडी
शेर्ले गावात पूर परिस्थितीत झालेल्या नुकसानीची भरपाई अद्यापपर्यंत व्यापारी व ग्रामस्थांना मिळालेली नाही. नुकसान होऊन आज चार महिने उलटले तरी नुकसानग्रस्तांच्या खात्यात एक रुपया सुद्धा जमा झाला नाही. अशी नाराजी लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान आपल्याला तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी त्यांनी तहसील प्रशासनाला निवेदन दिले.
यावेळी साबाजी धुरी, सुरेश सातोसकर, सुवर्णा देसाई, जयवंत धुरी, मुत्सुरा वड्डो, श्रेया तुळसकर, अन्विता धुरी, नागेश खातगावकर, प्रसाद तुळसकर, सविता धुरी, सदाशिव धुरी आदी उपस्थित होते.
त्यांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, २३ जुलैला आलेल्या पुराची नुकसान भरपाई अद्याप पर्यंत शेर्ले गावातील व्यापारी व ग्रामस्थांना मिळालेली नाही. घरगुती नुकसान भरपाई रु .१०,००० / – आणि व्यापायांसाठी रु .५०,००० / – याप्रमाणं निधी मंजूर झाला होता. त्यानुसार इन्सुली , निगुडे , बांदा या तिन्ही गावाच्या लोकांना भरपाई मिळाली मात्र शेर्ले गावातील लोकांना अद्याप भरपाई मिळालेली नाही. यापूर्वी नुकसंग्रस्तांनी सावंतवाडी तहसील कार्यालयात भेट दिली होती. यावेळी यादीप्रमाणे तुमच्या खात्यात पैसे जमा होतील, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्यापपर्यंत एकाही व्यापारी ग्रामस्थाच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे तात्काळ भरपाई देऊन सहकार्य करावे, असे म्हटले आहे.