कणकवली
सिलिका वॉशिंग प्लांटचे दूषित पाणी नदीत सोडून जनतेचे आरोग्य अवैध सिलिका व्यावसायिक धोक्यात आणत आहेत. याविरोधात २५ नोव्हेंबरला मनसे आंदोलन करणार असल्याची माहिती मनसे नेते परशुराम उपरकर यांनी आज दिली. तसेच सिलिका माफियांवर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याचा आरोप त्यांनी केला.
येथील मनसे कार्यालयात श्री.उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, कासार्डे पियाळी वाघेरी येथील अवैध सिलिका उत्खननाबाबत मनसेने यापूर्वी तक्रार केली आहे. पालकमंत्र्यांनी केलेल्या तक्रारींकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. ९ प्रकारच्या ३४८ त्रुटी काढल्या आहेत. सीमांकन नाही, पाण्याचा साठा उपसने, दूषित पाणी सोडणे, सिलिका साठ्याची नोंदणी नाही, पास नसणे आदी त्रुटी आहेत. ट्रेडर्स जे कुठलेही उत्खनन करायचे नसतानाही उत्खनन केले गेले. सिलिका माफियांनी अवैध सिलिका साठयाची चोरी केली आहे. 30 मार्च रोजी प्रांताधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडून आलेल्या अहवालानुसार आपला अहवाल जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्याकडे पाठवला आहे. मात्र याबाबत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी मागील ८ महिन्यांत कोणतीही कारवाई केली नाही. आम्ही मागे तक्रार केल्यानुसार सिलिका माफियांच्या पाठीशी अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी आहेत असा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
उत्खनन झालेल्या जेथे खड्डे पडले आहेत अशा जमिनींवर बोजा ठेवून प्रशासन दिखाऊ कारवाईचा आभास निर्माण करत आहे. अशा प्रकारे केलेली कोट्यवधीची दंड वसुली होऊ शकली नाही. सिलिका वॉशिंग प्लांट चे दूषित पाणी नदीत सोडून जनतेच्या पिण्याच्या पाणी दूषित करून त्यांचे आरोग्य अवैध सिलिका व्यावसायिक धोक्यात आणत आहेत. याविरोधात २५ नोव्हेंबर रोजी मनसे आंदोलन करणार असल्याचे पत्र प्रांताधिकाऱ्यांना दिले आहे. दीडशे ते दोनशे कोटींचा राज्याचा महसूल प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी आणि सिलिका माफियांनी संगनमताने बुडवला आहे. पियाळीतील अवैध सिलिका साठयाच्या चोरीविरोधात कारवाई न झाल्यास मनसे तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिला आहे.