जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची काव्यरचना
आजी वडाची साऊली आजी बापाची माऊली
दृष्ट काढे नातवांची पहा पावलो पावली
नाही छप्परही पहा महाराणी राजपुत्र
फुटे मायेला पाझर सगे सोयरे ना मित्र …
आभाळाच्या खाली घर ऐसपैस चुलीम्होर
माया पोटातली तिच्या कसा नेणार हो चोर
नाही भिती मनात नि कसे बसलेत छान
हेवा वाटावा तसे हो उभे पाठीमागे रान ….
दगडांचा तो शेजार उभी बाभुळ वाकडी
दार मोडके पडले चूल घडाडा पेटली
काय शिजवते पहा नातवाला गोडधोड
वाट पाहते लेकरू त्याला पडतसे कोडं….
मागे भिताडं कवाड नाही शेजार पाजार
अरे अरे असा कसा देवा लावसी जोजार
आहे त्यात समाधान ऐसपैस बसलेले
त्यांना पाहूनच पहा मन कसे सुखावले ….
आधी सांभाळला लेक आता सांभाळते नातू
आजी दुधावर साय पुन्हा पुन्हा जाते उतू
शोधू न ना सापडे हो गर्द वडाची साऊली
असो बापाची हो माय असो आईची माऊली ….
माय माऊली नि आजी स्वप्न देवाला पडले
एक एक रूप कसे पहा देवाने घडले
लेक असो असो आजी देवा हाताचा परीस
सारे घेती सांभाळून गेले हजारो वरीस ….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: १६ नोव्हेंबर २०२१
वेळ: रात्री: ८:०५