जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ लेखिका, कवयित्री प्रा. सौ.सुमती पाटील यांचा अप्रतिम लेख.
मुळात नारी हे शक्तीचेच प्रतिक आहे हे अनेक कथा
पुराणांमधून सांगण्यात आले आहे. आदिशक्ती, आदिमाया
हे त्याचेच द्योतक नाही काय..?वेद पुराण काळात अनेक
शक्तीशाली देवदेवता व स्रियांचे दाखले आपल्याला मिळतात.
संस्कृती उभारण्यात व जतन करण्यात स्रियांचा मोठा वाटा आहे.वेद काळात जेंव्हा संस्कृती निर्मिती प्रक्रिया सुरू झाली,
माणसाला पशुपासून माणूस बनविण्याचे प्रयत्न सुरू झाले,
तेव्हा उत्तरेतला आपला आश्रम सोडून जमदग्नींबरोबर रेणुका
नर्मदा तिरी येऊन राहिली.माणसाला माणूस बनविण्याचे
अथक परिश्रम तिने केले व हिंस्र माणसाला माणसात आणून
काही नियमांवर आधारीत अशी संस्कृती निर्माण झाली.
माणूस शेती करू लागला, अन्न धान्य पिकवू लागला .
गार्गी मैत्रेयी लोपामुद्रा अशा विद्वान स्रियांचेही दाखले आपल्याला देता येतील.ऋषीमुनींबरोबर ऋषी पत्नीचाही त्यांच्या कार्यात मोठा वाटा असे असा पुराणकालीन इतिहास
आपल्याला सांगतो.नारीशक्ती नेहमीच बरोबरीने काम करीत
होती असे दिसते…
त्याच प्रमाणे रामायण महाभारत काळातही स्रियांचे मोठेच
योगदान आपल्याला दिसते.दशरथासाठी कैकयीचे सारथ्य
व तिने मागितलेले वर आपल्याला माहित आहेत .सीता व तिच्या भगिनींचे कार्य व त्याग ही महानच होता.महाभारतकालीन कुंती गांधारी द्रौपदी ह्या तर तळपत्या
अग्निशिखाच होत्या.आपले कर्तृत्व दातृत्व व कर्तव्य यात
सतत त्या वरचढ राहिलेल्या दिसतात. म्हणजे कोणताही काळ
घेतला तरी स्रियांची शक्ती ही नेहमीच झळाळून उठली आहे
हे निर्विवाद सत्य आहे . बुद्धिमत्ता कर्तृत्व निर्णयक्षमता या
बाबतीत स्रिया कधी ही कुठे ही कमी पडलेल्या आपल्याला
दिसत नाहीत .
त्या नंतर येते १६ वे ते १८ वे शतक. मुघलांची राजपुतान्या
वरची आक्रमणे व त्या काळात राजपूत स्रियांनी दाखवलेले
अचाट धैर्य व शौर्य त्याला तर इतिहासात तोडच नाही. त्या
काळातील राण्या घुडसवारी व शस्र चालविणे ह्यात
वाकबगार असत . प्रसंगी अहिल्या बाईंसारखे हाती शस्र
घ्यायला ही त्या कचरत नसत. राणी लक्षुमीबाईंचा पराक्रम
कोणाला माहित नाही ? तशाच महाराणी ताराबाई साहेबांचा
दरारा व पराक्रमही साऱ्यांना विदित आहेच .महाराजा छत्रसाल
बुंदेलखंड, यांची कन्या मस्तानी देखील शस्र चालविण्यात
तरबेज होती. ह्या सर्व नारी जळजळत्या शक्ती होत्या.राज्य
चालवणे व सावरणे त्यांना चांगलेच अवगत होते. मी फक्त
काहीच उदा. दिली आहेत, ज्ञात अज्ञात अशा अनेक स्रियांचे
कर्तृत्व काळाच्या पडद्याआड लुप्त झाले आहे.
आणि आधुनिक वैज्ञानिक व प्रगत काळात तर किती तरी
नारींनी आपले अद्वितियत्व सिद्ध करून इतिहासात सुवर्ण
पान निर्माण केले आहे .
राजकारण बाजूला ठेवूनच अशा महान धाडसी महिलांचा
आपल्याला विचार करावा लागेल . विजयालक्ष्मी पंडित,(परदेशात भारतासाठी काम करणाऱ्या),
कृष्णा हाथीसिंग , स्वातंत्र्य लढ्यात काम करणाऱ्या अनेक
वीर स्रिया, भारताला जगात नवी ओळख देणाऱ्या मा. इंदिराजी.. ज्यांच्या कार्यकर्तृत्वावर व देशभक्तीवर कुणीही
संशयघेऊ नये ( मी राजकारण सोडून बोलते आहे),श्रीमती
बंदरनायके मॅडम, मार्गारेट थॅचर, सध्या आपापल्या उद्योग क्षेत्रात कार्यरत अनेक महिला..उदा. सुधा मुर्ती,
वेगळ्या क्षेत्रात नाव कमवणाऱ्या किरण बेदी,हजारोंनी उद्योग
चालवणाऱ्या उद्योजक महिला.. अगदी सोलापूरची कडक भाकरी व शेंगदाणा चटणी परदेशात निर्यात करून लाखोंचा
टर्न ओव्हर घेणारी उद्योजिका ,अशा सर्वच क्षेत्रात कोट्यावधींचा व्यापार महिलांनी यशस्वी पणे आपल्या ताब्यात घेतला आहे. चूल मूल बालसंगोपन एवढेच आमचे
क्षेत्र नसून जीवनाची कुठलीही लढाई आम्ही लढू शकतो हे
वैदिक ते पुराण काल व आधुनिक काळातही महिलांनी सिद्ध
करून दाखविले आहे. आम्ही चुली जवळ ही काम करु शकतो व श्रीहरी कोट्यात कलाम साहेबां बरोबर स्पेस मध्ये ही काम करू शकतो, हे स्रियांनी दाखवून दिले आहे.
नारी शक्तीची आणखी किती उदा. द्यावीत …? घरातही नारी
नसेल तर वारी करायचीच वेळ येते हे घरोघरी सारे अनुभवतातच…! नारी शिवाय घर ? चालूच शकत नाही हे
आपल्याला चांगलेच माहित आहे , मग तिच्या कार्यकर्तृत्वाचा
व शक्तीचा आणखी कोणता वेगळा पुरावा द्यायला हवा ….?
म्हणून नारीचा आदरच करायला हवा हे काय नव्याने सांगायला हवे..? दुर्दैवाने ते आज सांगावे लागते .
आतातरी आपल्यातल्या पशुला बाजूला सारून जगत्जननी
आईचा, महिलांचा सन्मान करायला शिकू या..हीच नारी साठी
मोठी देणगी ठरेल …
॥“ शुभं भवतु …”॥
जयहिंद .. जय महाराष्ट्र ….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १९ नोव्हेंबर २०२१
वेळ संध्या: ४: ५७